
सर्व सरकारी कार्यालयांत मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करावा असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार सर्वसामान्यांसाठी घरे बांधणाऱया म्हाडामध्ये मराठीचा वापर होत असला तरी त्यांचे मराठी ‘कच्चे’ असल्याचे समोर आले आहे. म्हाडाच्या संकेतस्थळावर वेगवेगळय़ा प्रकारची ऑनलाइन बिले उपलब्ध आहेत. त्यामध्ये ‘प्रिन्सिपल’ हा शब्द रकमेसंदर्भात दिला असून त्याला मराठीत कुठे मुख्य, कुठे तत्त्व, तर कुठे प्राचार्य म्हटले आहे. म्हाडाच्या या कच्च्या मराठीचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
म्हाडाने एकाच शब्दाचे भाषांतर करताना त्याला वेगवेगळे शब्द दिले असल्याचा स्क्रीनशॉट राज्यशास्त्र्ााचे अभ्यासक, भाषिक चळवळीचे कार्यकर्ते दीपक पवार यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे. यावरून अनेकांनी कमेंट केल्या असून म्हाडा आपल्या मराठी भाषेला गंभीरपणे घेत नसल्याचे एका व्यक्तीने म्हटले आहे. तर दुसऱयाने म्हाडाला चांगल्या मराठी अनुवादकाची गरज असल्याचे म्हटले आहे. म्हाडाच्या या गोंधळी कारभाराबाबत निषेध व्यक्त होत आहे.






























































