
विक्रीअभावी धूळ खात पडलेल्या घरांची विक्री करण्यात म्हाडाला यश येत आहे. अवघ्या पाच महिन्यांत कोकण मंडळाने विरार बोळींज, गोठेघर, भंडार्ली येथील 5376 घरांची विक्री केली असून सुमारे 800 कोटी रुपयांचा महसूल प्राधिकरणाच्या तिजोरीत जमा झाला आहे. वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या घरांमुळे म्हाडाचा मोठा निधी अडकला होता. शिवाय या घरांच्या देखभालीवर म्हाडाला स्वतःच्या तिजोरीतून पैसे खर्च करावे लागत होते.
विरार बोळींज येथे म्हाडाने 2014 मध्ये 9409 घरे उभारली होती. त्यापैकी आतापर्यंत 7783 घरांची विक्री झाली आहे. गेल्या पाच महिन्यांत 3750 घरांची विक्री झाली असून 1626 घरे विक्रीअभावी पडून आहेत. भंडार्ली येथे 2019-20 मध्ये 1769 घरे उभारली होती. त्यापैकी आतापर्यंत 1767 घरे विकली असून गेल्या पाच महिन्यांत 811 घरांच्या विक्रीचा प्रश्न मार्गी लागला आहे. गोठेघरला 2019-20 मध्ये 1659 घरे उभारली होती त्यापैकी आता केवळ 67 घरे शिल्लक आहेत.
- म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण मंडळाने विक्रीअभावी पडून असलेल्या घरांच्या विक्रीसाठी ठिकठिकाणी जनजागृती करत ठरावीक सवलत दिली. घरांच्या विक्रीसाठी खासगी एजन्सीची मदत घेतली. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांत 5 हजारांहून अधिक घरांची विक्री करणे शक्य झाल्याचे कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी सांगितले.
खोणी-शिरढोणच्या घरांचा पुन्हा लॉटरीत समावेश
कोकण मंडळाने शिरढोण येथे 7141 तर खोणी येथे 5060 घरे उभारली होती. या घरांचा 2025 मध्ये काढलेल्या लॉटरी समावेश केला होता. तरीही शिरढोण येथील 5320 आणि खोनी येथील 2744 घरांची विक्री झालेली नाही. या घरांचा केवळ एकदाच लॉटरीत समावेश केलेला आहे. त्यामुळे पुन्हा त्यांचा लॉटरीत समावेश केला जाणार आहे.
























































