पावसाळ्यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करा! होर्डिंगधारकांना म्हाडाची नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळ्यात म्हाडाच्या जागेवर असलेले होर्डिंग कोसळून दुर्घटना घडू नये यासाठी म्हाडाने आतापासून पावले उचलली आहेत. पावसाळय़ापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करा, अशी नोटीस प्राधिकरणाने होर्डिंग कंपन्याना बजावली आहे. रिपोर्ट सादर न करणाऱया कंपन्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारादेखील नोटिसीद्वारे देण्यात आला आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर जागे झालेल्या म्हाडाने आपल्या जागेवर असलेल्या होर्डिंगचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणात म्हाडाच्या जागेवर असलेल्या 62 पैकी 60 होर्डिंगसाठी म्हाडाची एनओसी घेतली नसल्याचे आढळले होते. जागामालक म्हणून म्हाडाची एनओसी घेणे गरजेचे असतानाही पालिकेची परस्पर परवानगी घेऊन हे होर्डिंग उभारले होते. त्यानंतर म्हाडाने दोन होर्डिंग जमीनदोस्त केले होते. आता मुंबई शहर आणि उपनगरात म्हाडाच्या जागेवर 58 होर्डिंग आहे. पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश म्हाडाने संबंधित होर्डिंगधारकांना दिले आहेत. त्याबाबतच्या नोटीस जाहिरात कंपन्याना देण्यात आल्या आहेत, अन्यथा या होर्डिंगवर कारवाई केली जाणार आहे.