एमआय ज्युनियर एक स्तुत्य आणि आवश्यक उपक्रम – यास्तिका भाटिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

 

मुंबई इंडियन्स महिला संघाची यष्टीरक्षक आणि टीम इंडियाची सलामीवीर यास्तिका भाटिया हिच्यासह फलंदाजी प्रशिक्षिका देविका पळशीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एमआय ज्युनियर आंतर-शालेय क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या हंगामाला पोलीस जिमखाना, मरिन लाइन्स मैदानावर दिमाखात सुरुवात झाली. यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीची एमआय ज्युनियर ही आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा एक स्तुत्य आणि आवश्यक उपक्रम असल्याचे भाटिया हिने यावेळी म्हटले.

एमआय ज्युनियर ही वार्षिक स्पर्धा महाराष्ट्रातील नवोदित क्रिकेटपटूंसाठी एक उत्तम व्यासपीठ ठरले आहे. या खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी उपलब्ध करून देतो. तळागाळातील विकासात योगदान देणे आणि सर्वांसाठी शिक्षण आणि क्रीडा (ईएसए) अंतर्गत शिक्षण आणि क्रीडा या दोन्हीमध्ये शिकण्याची संधी प्रदान करण्यात पुढाकार घेणे, हे मुंबई क्रिकेट असोसिएशन(एमसीए), विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए)आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या क्रिकेट संघटनांच्या सहकार्याने आयोजित केल्या जाणार्‍या एमआय ज्युनियर स्पर्धेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

यंदाच्या हंगामाची ठळक वैशिष्ट्ये –

• एमआय ज्युनियर ही स्पर्धा पुन्हा एकदा 14 वर्षांखालील मुले, 15 वर्षांखालील मुली आणि 16 वर्षांखालील मुले या तीन गटांमध्ये खेळवली जाईल.
• या हंगामात एकूण 300 संघ सहभागी होणार आहेत. आजवरच्या एका हंगामासाठीची ही सर्वाधिक संख्या आहे.
• आगामी आवृत्ती मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन शहरांमध्ये आयोजित केली जाईल

एमआय ज्युनियर स्पर्धेच्या पहिल्या तीन आवृत्त्यांमध्ये 500 हून अधिक संघ आणि 8000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर यांच्यासह देशातील काही महान क्रिकेटपटूंना घडवणार्‍या मुंबईतील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित मैदानांवर यंदाच्या आवृत्तीतील सामने होतील. या स्पर्धेतील अपडेट आणि स्कोअर एमआयच्या सोशल मीडिया हँडलवरील अपडेट्ससह मुंबई इंडियन्सच्या वेबसाइटवर उपलब्ध असतील.

एमआय ज्युनियर बद्दल

एमआय ज्युनियर ही मुंबई इंडियन्सची आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा असून यंदाची चौथी आवृत्ती आहे. सर्वांसाठी शिक्षण आणि क्रीडा (ईएसए) कार्यक्रमांतर्गत ही स्पर्धा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या स्पर्धेत महिला अंपायर आणि स्कोअरर्सचा समावेश करून सर्वसमावेशकतेवर भर दिला जातो. विजेत्या संघाला #OneFamily कडून प्रशिक्षकाअंतर्गत प्रशिक्षणाची एक अनोखी संधी मिळते, ज्यामुळे तळागाळातील विकासाला हातभार लागतो आणि त्या त्या भागातील गुणवत्तेला वाव मिळतो.