
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेतला कार्यकाळ आज संपला. आज विधानपरिषदेत त्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी सभागृहात भाषण करताना ‘मी पुन्हा येईन’, असं ते म्हणाले आहेत.
विधानपरिषदेत भाषण करताना अंबादास दानवे म्हणाले की, “दहावीला असताना शाळेत अशा प्रकारचा निरोप समारंभ झाला होता. त्यानंतर पहिल्यांदा असा निरोप समारंभ होत आहे. मात्र दहावीला निरोप समारंभ झाल्यानंतर त्याच कॉलेजात जावं लागलं. त्यामुळे मला वाटतं याची चिंता करण्याची गरज नाही. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, मी पुन्हा येईल. मी सुद्धा पुन्हा येईल, त्याची चिंता करण्याची गरज नाही.”
यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “मी एक कार्यकर्ता, एक शिवसैनिक आहे. महिन्या, दीड महिन्याआधी रोहित शर्मा आणि विराट कोहली निवृत्त झाले. त्यांनी सांगितलं आम्ही फक्त कसोटी खेळणार नाही. मात्र वन-दे आणि 20 – 20 खेळणार आहे. तसं मी येथे येणार नाही, मात्र माझ्या मॅचेस सुरू राहतील. मी सगळ्या पदावर आहे, मात्र सगळे हे विसरलेत आहे की, मी आता शिवसेनेचा नेताही झालो आहे. शिवसेनेत पक्षप्रमुखांनंतर नेता हा महत्त्वाचा असतो. ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे फार कमी वयात मिळाली.”