
प्रचंड गाजावाजा करत, खास आपल्या ‘मायक्रोसॉफ्ट एज’च्या ब्राउझरसाठी सुरू करण्यात आलेले ई-बुक स्टोअर बंद करण्याची वेळ मायक्रोसॉफ्टवरती आली आहे. मुळातच नावीन्याचा अभाव आणि अत्यंत स्लो स्पीड यामुळे विनोदाचा विषय बनलेल्या आपल्या इंटरनेट एक्प्लोररच्या जागी मायक्रोसॉफ्टने ‘एज’ या नव्या ब्राउझरच्या पर्यायदेखील उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर ब्राउझरच्या तुलनेत एज फक्त 4.4 टक्के बाजारपेठ व्यापू शकला आहे. अशातच एजसाठीचे ई-बुक स्टोअरदेखील बंद करण्यात येते आहे. ई-बुक स्टोअरवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आणि अगदी ग्राहकांनी खरेदी केलेली पुस्तकेदेखील आपल्या जायंट क्लाऊड सर्व्हरवरून मायक्रोसॉफ्ट डिलीट करणार आहे. ह्या सॉफ्टवेअरमधील annotations जर 2 एप्रिल 2019 पर्यंत वापरलेली असतील, तर ग्राहकांना त्यांच्या खरेदी केलेल्या पुस्तकाचे पूर्ण पैसे तर मिळतीलच पण जोडीला $25 बोनस क्रेडिटदेखील मिळणार आहे. इतर ई-बुक रिडर्समध्ये असलेल्या बहुपयोगी आणि लोकप्रिय फिचर्सचा मायक्रोसॉफ्टच्या ई-बुक रिडरमध्ये कायमच अभाव राहिला आहे. स्टिकी नोट्स, बुकमार्क्स, लिंकिंग, हायलायटनिंग अशा अनेक सुविधांचा त्यात अभाव होता. या सेवा नंतर एजमध्ये अपडेट करण्यातदेखील आल्या, पण त्या टिकाव धरायला मदत करू शकल्या नाहीत. ऍपल बुक आणि किंडलसारख्या तगड्या स्पर्धकांशी सामना करणे मायक्रोसॉफ्टला शक्य झाले नाही. मायक्रोसॉफ्टच्या ई-रिडरवरची पुस्तके डाऊनलोडदेखील करता येत नसल्याने अधिक गैरसोयीचा वाचक सामना करत होते. ई-बुक रिडिंगच्या क्षेत्रात मायक्रोसॉफ्टचे हे तिसरे अपयश म्हणायला हवे. यापूर्वीदेखील त्यांनी MS Reader हे एलसीडी स्क्रीनसाठीचे बुक रिडर सॉफ्टवेअर बनवले होते, मात्र त्यालाही फारसे म्हणावे यश मिळाले नाही. त्यानंतर मायक्रोसॉफ्टने $300 मिलियन्स येवढी प्रचंड गुंतवणूक करून बार्न्स आणि नोबेलच्या मदतीने त्यांच्या भागीदारीत त्यांच्याच ‘Nook’ विभागात केलेली गुंतवणूकसुद्धा अपयशीच ठरली होती.





























































