
गोव्याहून पुण्यात येणाऱया स्पाइसजेटच्या विमानाच्या खिडकीची फ्रेम हवेतच निखळली. या घटनेने प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. मंगळवारी ही घटना घडली. गोवा-पुणे विमानाच्या उड्डाणाची वेळ सायंकाळी 5.20 ची होती; मात्र दीड तास उशिराने 6.55 वाजता विमानाने पुण्याच्या दिशेने उड्डाण केले, पण उड्डाणानंतर अर्धा तासाने एका खिडकीची फ्रेम निखळली. खिडकीजवळ एक महिला आपल्या लहान मुलासह बसली होती. ती प्रचंड घाबरली. विमानातील केबिन क्रूने त्या महिलेला वेगळ्या सीटवर बसवले. या घटनेचा व्हिडीओ प्रवाशांनी व्हायरल केला असून, विमान कंपन्यांच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.
स्पाइसजेटने काय म्हटले आहे
स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने याबाबत खुलासा केला आहे. ‘स्पाइसजेटच्या क्यू-400 विमानातील एक कॉस्मेटिक विंडोफ्रेम उड्डाणादरम्यान सैल झाल्यामुळे निखळली. हा एक नॉनस्ट्रक्चरल ट्रिम घटक होता. जो सावलीसाठी खिडकीवर बसविण्यात आला होता. या घटनेमुळे विमानाची कोणतीही सुरक्षितता धोक्यात आली नाही. प्रवाशांच्या सुरक्षिततेवर कोणताही परिणाम झाला नाही’, असे स्पाइसजेटने म्हटले आहे.