
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात तीव्र बॉम्बहल्ले सुरू आहेत. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, विविध घटनांमध्ये आतापर्यंत 8 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला असून एक नागरिक अद्याप बेपत्ता आहे. संबंधित व्यक्तीचा शोध सुरू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. TV9 ने याबाबत वृत्त दिले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव (आखाती) असीम आर. महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, नुकत्याच कुवैतमध्ये झालेल्या एका हल्ल्यात एका हिंदुस्थानी नागरिकाचा मृत्यू झाला. “या दुर्दैवी घटनेबद्दल आम्ही मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो,” असे त्यांनी नमूद केले. कुवैतमधील हिंदुस्थान दूतावास मृताच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असून स्थानिक प्रशासनाच्या मदतीने पार्थिव शरीर लवकरात लवकर हिंदुस्थानात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या मृत्यूमागील नेमकी कारणे त्यांनी स्पष्ट केली नाहीत.
महाजन यांनी पुढे सांगितले की, 28 फेब्रुवारीपासून आतापर्यंत मध्यपूर्वेतून सुमारे 55 लाख प्रवासी हिंदुस्थानात परतले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारकडून हिंदुस्थानी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की, “मध्यपूर्वेतील परिस्थितीवर आम्ही सतत लक्ष ठेवून आहोत. सर्व पक्षांनी संयम राखावा आणि तणाव कमी करावा, असे आम्ही आवाहन करत आहोत. हा संघर्ष लवकरात लवकर संपवण्यासाठी संवाद आणि कूटनीती हाच मार्ग आहे, यावर आमचा भर आहे.”
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 मार्च रोजी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती, व्यापारिक जहाजांची सुरक्षा आणि समुद्री मार्गावरील मुक्त वाहतूक (नौवहन स्वातंत्र्य) याबाबत सहमती व्यक्त करण्यात आली. तसेच प्रादेशिक ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणाऱ्या हल्ल्यांचा हिंदुस्थानने तीव्र निषेध नोंदवला.
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की मध्यपूर्वेतील विविध देशांमध्ये कोट्यवधी हिंदुस्थानी वास्तव्यास आहेत आणि त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. या देशांतील हिंदुस्थान दूतावास 24 तास कार्यरत असून हिंदुस्थानी समुदायाशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे. यासाठी 24×7 हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली असून आवश्यक सूचना आणि मार्गदर्शक सूचना नियमितपणे जारी केल्या जात आहेत.




























































