
हवामान बदल आणि लांबलेला परतीचा पाऊस याचा फटका यंदा कल्याण-डोंबिवली आणि उरण परिसरातील खाडी किनाऱ्यावर येणाऱ्या स्थलांतरित – पक्ष्यांना बसला आहे. बदल त्या ऋतुमानामुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या जीवनचक्रावर परिणाम झाला असून हिवाळ्याच्या सुरुवातीस युरोप, सायबेरिया, आफ्रिका या देशांतून कल्याण, डोंबिवलीच्या खाडी किनारी येणारे फ्लेमिंगो, ब्लॅकटेल्ड पिंक टेल डक, डेझर्ट व्हीट ईअर, लाँग टेल श्राईक, रोजेस स्टार्लिंग, ब्लू थ्रोट, मार्श हॅरियर यांसारखे स्थलांतरित पक्षी यंदा दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे ‘का कळेना अशी हरवली पाखरे’ असे म्हणत पक्षीप्रेमी चिंता व्यक्त करत आहेत.
साधारणपणे नोव्हेंबरपासून मोठ्या प्रमाणात थंडीला प्रारंभ होतो आणि त्या अनुषंगाने बर्फाळ उत्तरेकडील प्रदेशांतील पक्षी अन्न आणि आश्रयासाठी दक्षिणेकडे स्थलांतर करतात. कल्याण, डोंबिवलीतील खाडी परिसर तसेच उरण जेएनपीटी परिसरात दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून युरोप, सायबेरिया आणि आफ्रिकन देशांतून स्थलांतरित पक्षी दाखल होतात. मात्र या पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासांवर अतिक्रमण आणि प्रदूषणात वाढ झाल्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत आहे.
हजारो किलोमीटरचा प्रवास
हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणारे सिगल, फ्लेमिंगो, ब्लॅकटेल्ड गॉडवीट, नॉर्दर्न शोवलर, पिंक टेल डक, डेझर्ट व्हीट ईअर, सायबेरियन स्टोन चॅट, लाँग टेल श्राईक, ब्लू टेल बी ईटर, रोजेस स्टार्लिंग, ब्लू थ्रोट, व्हाईट स्टॉर्क, थापट्या, तलवार बदक आणि मार्श हॅरियर यांसारखे पक्षी दरवर्षी कल्याण-डोंबिवली खाडी किनाऱ्यावर दिसतात. मात्र यंदा या पक्ष्यांची संख्या तुलनेने कमी असल्याचे पक्षी अभ्यासक रूपाली शाईवाले आणि प्रथमेश देसाई यांनी सांगितले.
खुबे, मासे, शेवाळ आवडते खाद्य
उरणमधील जेएनपीटी परिसरातील पाणजे, डोंगरी, गव्हाण-न्हावा, करंजा खाडी किनारा आणि पाणथळी जागा, जलाशये स्थलांतरित पक्ष्यांची आश्रयस्थाने आहेत. पाणथळी आणि जलाशयात खुबे, मासे, शेवाळ, कृमी, कीटक आदी पक्ष्यांचे आवडते खाद्य विपुल प्रमाणात उपलब्ध होत असल्याने विविध जातींचे स्थलांतरित पक्षी या परिसरात मोठ्या प्रमाणात येतात.

























































