वातावरणाच्या बदलाचा स्थलांतरित पक्ष्यांना फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यावर्षी निसर्गाने बदलेल्या कालचक्राचा फटका निसर्गातील प्रत्येक घटकाला सोसावा लागत आहे. बदललेले ऋतूमान, अवकाळी पाऊस, वारंवार निर्माण होणारी चक्रीवादळे यामुळे दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवडयात कोकणाच्या पाणथळ भागात दाखल होणारे परदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन लांबले आहे. त्यामुळे कोकणातील सर्वच ठिकाणी असलेले पाणवठे मात्र परदेशी पक्ष्यांच्या आगमनाने ‘ओस’ पडले आहेत.

हजारो किलोमीटरचा प्रवास करून कोकणाची वेस ओलांडणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांना कोकणाचा निसर्ग भावतच असतो. मात्र या वर्षी ऋतूमानात प्रचंड बदल झाल्याने त्याचा फटका मात्र पक्ष्यांना बसला आहे . किंबहुना त्याचा परिणाम त्यांच्या प्रवासावर झाला आहे. सद्यस्थितीत अतिवृष्टी, अवर्षण, वादळे यामुळे दिवसेगणिक वातावरण बदलत आहे. त्यामुळे परदेशी पक्षी येण्याचा कालावधी देखील बदलत चालला आहे. परदेशातून येणाऱ्या पक्ष्यांप्रमाणेच स्थानिक प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्थलांतरीत होणाऱ्या पक्ष्यांवरही बदललेले वातावरण व लांबलेल्या पावसाचा परिणाम जाणवू लागल्याने त्यांच्या प्रवासात आता वातावरणच अडथळा बनला आहे.

ऑक्टोबर सुरू झाला की, कोकणातील पाणथळ भाग परदेशी पक्ष्यांनी अक्षरश: गजबजून जातात. मोठया प्रमाणात अन्न मिळत असल्याने परदेशी पाहूणे पक्ष्यांचा किलबिलाट पाणथळ भागात दिसून येतो. मात्र यावर्षी पाणवठे काही अंशी ओसच पडल्याचे चित्र दिसून येत असल्याने पक्षी मित्रांच्या घिरटया मात्र पाणथळ भागात वाढल्या आहेत. वातावरणातील बदलामुळे अनेक पक्ष्यांनी कोकणाची वेस ओलांडलेलीच नाही. दरवर्षी हमखास दिसणारे पाहूणे पक्षी मात्र यावर्षी जवळ-जवळ त्यांची संख्या घटलेलीच आहे. ऑक्टोबर महिन्यात जी पक्ष्यांची संख्या अपेक्षित होती त्या प्रमाणात खुपच कमी पक्षी पाणथळ भागात दिसून येत आहेत. नोव्हेंबर पर्यंत लांबलेला पाऊस त्यात समुद्र किनारपट्टीवर एकामागोमाग एक निर्माण होणारी चक्री वादळे यामुळे परदेशी पाहुण्यांच्या प्रवासाला जणू काही ब्रेकच मिळाला आहे. किनारपट्टी भागात दरवर्षी येणारे फलेमिंगो पक्षी देखील यावर्षी दाखल झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या येण्याचा कालावधी देखील वातावरणाच्या बदलामुळे रोखून धरला आहे.

तिबेट, सायबेरीया, लडाख, हिमालय, हंगेरिया, डेंन्मार्क, युरोप यासारख्या थंड प्रदेश-देशांमधून लाखो किलोमीटरचा प्रवास करून कोकणातील पाणथळ भागात अनेक पक्ष्यांचे थवे मोठया प्रमाणात दाखल होत असतात. काही पक्ष्यांच्या विणीचा हंगाम देखील कोकणाच्या गर्द झाडीत सुरू होतो. मात्र त्यापैकी कोणतेच पक्षी अदयापी दाखल न झाल्याने कोकणात दाखल होणाऱ्या पक्ष्यांच्या ठळक बदल पक्षी मित्रांच्या ध्यानात येत आहे. त्यामुळे त्यांची धडधड देखील वाढलेली आहे.

गेले अनेक वर्ष विना खंड हजारो किलोमीटरचा प्रवास करून अनेक देशातील पक्षी पावसाळा संपल्यनंतर कोकणाची वेस ओलांडू पाहतात. त्यामध्ये अनेक पक्षी प्रजननाचा काळ आपल्या सोबत घेवून येत असतात. त्यामुळे कोकणातील निसर्गाला धुक्याची चादर पांघरणाऱ्या थंडीमध्ये आणखीनच त्यांच्या आगमनाने बहर येतो. कोकणातील रायगड, रोहा, उत्तर रत्नागिरी, श्रीवर्धन, ठाण्यातील काही खाडीचा भाग यासारख्या ठिकाणी तर तळ कोकणातील हर्णे, मुरुड, केळशी, आंजर्ले, अंजनवेल, गुहागर या सारख्या ठिकाणी मुळचा सायबेरीया या देशातील फ्लेमिंगो पक्षी व त्याच्या सह रशियातील असलेला सिगल पक्ष्याचे थवेच्या थवे थंडीच्या मौसमात दाखल होत असतात.

वातावरणात होत असलेला बदल सध्या पक्ष्यांना जरी मारक ठरत असला तरी आगामी महिना भराच्या कालावधीत ओस पडलेले पाणवठे पक्ष्यांचा किलबिलाटांनी गजबजून जाण्याची शक्यता पक्षी प्रेमींमधून व्यक्त होत आहे.