
केईएम, नायर आणि कूपर या रुग्णालयातील जैववैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. यामुळे रुग्ण आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून या रुग्णालयांवर कारवाई करा, अशी मागणी शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी केली.
पालिकेच्या केईएम, नायर आणि कूपर या रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याच्या अनेक तक्रारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने तिन्ही रुग्णालयांच्या तपासणीत काही आढळले का, याप्रकरणी संबंधित रुग्णालयांवर शासनाने कोणती कारवाई केली, असा प्रश्न मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केला होता. त्यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, पालिकेच्या या तिन्ही रुग्णालयांतील जैववैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येत नसल्याबाबत सप्टेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत तिन्ही रुग्णालयांना 30 सप्टेंबर 2025, 20 ऑक्टोबर 2025 रोजी व नायर रुग्णालयाला तक्रार प्राप्त होण्याआधीच 7 ऑगस्ट 2025 ला निर्देश दिले असून 27 फेब्रुवारी रोजी अंतरिम निर्देश दिले आहेत.
केईएम रुग्णालयात कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित होत असून या ठिकाणी एसटीपी आणि ईटीपीसाठी काम सुरू आहे. नायरमध्ये 300 केएलडीचा एसटीपी प्रस्तावित असून आणखी एक हजार केएलडीची त्यांना आवश्यकता आहेत. कूपर रुग्णालयात एसटीपी आणि ईटीपी आहेत, पण ते जुन्या टेक्नोलॉजीचे असल्याने आधुनिक तंत्रज्ञानानुसार करण्याची गरज असून त्यादृष्टीने योग्य पावले उचलली जातील असे मुंडे म्हणाल्या.





























































