मुंबईकर गावाला गेल्याने दूध डेअऱ्यांच्या तोंडाला फेस, मागणी साडेचार लाख लिटरने घटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
milk-1
म्हशीच्या दुधात जास्त प्रथिनं असतात. तर गायीच्या दुधात कमी प्रथिनं असतात. म्हणूनच म्हशीचे दुध पचण्यास थोडं जड असतं.

सामना प्रतिनिधी । मुंबई

उन्हाळा सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मुंबईकरांनी गावची वाट धरल्याने दूध डेअऱयांच्या तोंडाला फेस आला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून आर्धी मुंबई खाली झाल्याने दररोजची 40 लाख लिटरच्या घरात असलेली दुधाची मागणी 35 लाख लिटरपर्यंत खाली आली आहे. सध्या रमजानचा काळ सुरू असल्याने दुधाची मागणी वाढणे अपेक्षित असतानाही साडेचार-पाच लाख लिटरने मागणी घटल्याने शिल्लक राहणाऱया दुधाचे करायचे काय, असा प्रश्न मुंबापुरीला दूध पुरवठा करणाऱया डेअऱयांसमोर उभा राहिला आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत दररोज सुमारे 40 लाख लिटरहून अधिक पिशवीबंद दुधाचे वितरण होते. वर्षभर असलेल्या या मागणीला एप्रिलच्या शेवटय़ा आठवडय़ापासून घसरण लागली आहे. उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी नागरिक मोठय़ा प्रमाणात कुटुंबकबिल्यासह मुंबईबाहेर गेले आहेत. त्याचा थेट परिणाम दुधाच्या मागणीवर झाला. ऐन दुष्काळातही राज्यात दुधाचे मुबलक उत्पादन होत असल्याने उन्हाळ्यामुळे घटलेली मागणी रमजान काळात वाढेल असा दूध डेअऱयांचा अंदाज होता. मात्र फारशी वाढ झालेली नसल्याने अतिरिक्त असलेले दूध पावडर बनवण्यासाठी वापरले जात आहे. ही घसरण 15 जूनपर्यंत राहील, अशी माहिती इग्लू डेअरीचे प्रमुख एस.एस. पाटील यांनी सांगितले.

तबेल्यांची दूध विक्रीही सात-आठ टक्क्यांनी घटली
मुंबईत दररोज जवळपास दहा लाख लिटर तबेल्याच्या दुधाची विक्री होते. छोटय़ा दुकानांच्या माध्यमातून होत असलेल्या या विक्रीत सात-आठ टक्क्यांची घसरण झाल्याचे मुबई मिल्क प्रोडय़सर असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

उन्हाळी सुट्टीचा दुधाच्या विक्रीवर परिणाम झाला असून आठ-दहा टक्क्यांनी मागणी घटली आहे. त्यामुळे अतिरिक्त ठरणारे दूध सहउत्पादनांबरोबरच पावडर निर्मितीसाठी वापरले जात आहे.- दयानंद पाटील, गोकुळ डेअरी (मार्केटिंग)