दूध उत्पादकांना प्रतिलिटर 10 रूपये अनुदान द्यावे, शेतकऱ्यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आर्थिक कणा व शेतीला जोडधंदा म्हणून ओळखला जाणारा दूधव्यवसाय सध्या अडचणीत सापडला आहे. आर्थिक मंदी आणि कोरोनामुळे सध्या दुधाची 22 रुपये दराने खरेदी होत असल्याने आणि पशुखाद्याच्या किमती गगनाला भिडल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. हा दूधव्यवसाय वाचविण्यासाठी शासनाने शेतकऱयांना प्रतिलिटर 10 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.

ताजा पैसा मिळवून देणारा अशी ओळख असलेला दूधव्यवसाय सध्या चुकीच्या धोरणांमुळे काळवंडला आहे. कोरोना महामारीच्या कचाटय़ात दूधव्यवसाय अडचणीत सापडला आहे. पाच महिन्यांपूर्वी 33 रुपयांपर्यंत गेलेला दुधाचा दर कोरोनामुळे लॉकडाऊन लागताच दहा रुपयांनी खाली आला आहे. याउलट ग्राहकांना मात्र 44 रुपये प्रतिलिटर दूध विकत घ्यावे लागते आहे. मग मधली मलई कोण खातंय? असा सवाल दूधउत्पादकांनी केला आहे. दूध खरेदीदारांना प्रतिलिटर दहा रुपये प्रक्रिया खर्च येत नाही; मग दुधाचे दर इतक्या मोठय़ा प्रमाणात पडण्याचे गौडबंगाल काय? असा सवाल उपस्थित होत आहे. डिसेंबर 2020ला 1000 ते 1100 रुपयांना मिळणारे 50 किलोचे सरकीपेंडचे पोते आता चक्क 1800 रुपयाला विकत घ्यावे लागत आहे. यामुळे पशुधन कसं संभाळावं? हा गंभीर प्रश्न आहे.

कोरोनामुळे जनावरांचे बाजार बंद असल्याने पशुधन विकता येत नाही. त्यामुळे जनावरं अंगावर पोसावी लागत आहेत. उन्हाळ्यात हिरवा चारा मिळणे अवघड झाले आहे. जो मिळतो त्याचे दर गगनाला भिडले आहेत. या दुहेरी संकटाला दूध उत्पादक शेतकरी सामोरे जात आहेत. दूध संघ हे शेतकऱयांकडून 22 रुपये दराने गाईचे दूध खरेदी करून ग्राहकांना 44 रुपयांनी विकतात. म्हणजे लिटरमागे 22 रुपयांचा नफा दलाल खात आहेत. दूधव्यवसाय वाचवायचा असेल तर शासनाने पशुखाद्याचे दर कमी करून शेतकऱयांना प्रतिलिटर 10 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.