दूध खरेदीसाठी आज मंत्रालयात बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुधाचे दर घटल्यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मंगळवार 21 जुलै रोजी दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

राज्यात गेल्या चार महिन्यांपासून ‘कोरोना’मुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी घटल्यामुळे दूध संघाने दूध खरेदी दर कमी केले आहेत. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. दुधाला वाजवी दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नेते आणि दूध उत्पादक प्रतिलिटर अनुदान द्यावे, अशी मागणी करत आहेत. या विविध समस्यांच्या अनुषंगाने शेतकरी आणि दूध संघाचे प्रश्न समजावून घेऊन त्यातून मार्ग काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला ‘महानंद’चे अध्यक्ष, दूग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, विविध शेतकरी संघटनांचे प्रमुख तसेच राज्यभरातील विविध दूध संघांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक उपस्थित राहणार आहेत.

दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटना, विरोधी पक्षाचे राज्यात आंदोलन
दूध उत्पादक शेतकऱयांना प्रति लिटर 10 रु. अनुदान देण्यात यावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो 50 रु. अनुदान द्यावे, तसेच गाईच्या दुधाला 30 रु. दर द्यावा आदी विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनांसह विरोधी पक्षांनी राज्यात आंदोलन सुरू केले आहे. अकोले, नगर येथे शेतकरी संघर्ष समिताने दगडाला दुधाचा अभिषेक घालून केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला. भाजप आणि महायुतीच्या घटकपक्षांनी जिल्हा, तालुका स्तरावर जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन आणि दूध पिशवीची भेट देत प्रतीकात्मक आंदोलन केले.

नैतिक अधिकार भाजपला नाही – बाळासाहेब थोरात
गेल्या पाच वर्षांत मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने शेतकऱयांची फसवणूकच केली आहे. दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या प्रचंड संघर्षामुळे इच्छा नसताना त्यांना घ्यावा लागला. पण काही महिने 5 रु., नंतर 3 रु. अनुदान देऊन योजनाही गुंडाळून टाकली. त्यामुळे आज 10 रुपये अनुदान मागण्याचा आणि दूध प्रश्नावर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार भाजपला नाही. भाजपने आता स्वतःच्या विरोधात आंदोलन करून पापक्षालन करावे, अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.