मुंबईकरांच्या फ्रीजमध्ये दोन दिवसांपुरतेच दूध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

दुधाला वाढीव दर मिळावा म्हणून शेतकऱयांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे दुधाला उकळी फुटली आहे. मुंबईला दूध घेऊन येणारे टँकर शेतकऱयांनी रविवारी ठीकठिकाणी अडवल्याने आज मुंबईत दुधाचा एकही टँकर आला नाही. त्यामुळे महानंद, गोकुळ, अमूल, वारणासह सर्वच डेअऱयांकडील दुधाचा स्टाक घटला असून सध्या त्यांच्याकडे केवळ दोन दिवस पुरेल एवढेच दूध शिल्लक आहे. त्यामुळे गुरुवारपासून मुंबईकर दुधासाठी नक्कीच हातघाईवर येणार आहेत.

milk-distribution-text-phot

मुंबईत दररोज महानंद, अमूल, गोकुळ, वारणा, प्रभात, मदर, आरे या डेअऱया सुमारे  ४० लाख लिटर दुधाचे वितरण करतात. हे दूध राज्यभरातून मुंबईत येते. मात्र रविवारपासून मुंबईत येणाऱया दुधाचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे आज स्टॉकमध्ये असलेल्या दुधाचे वितरण केले असून त्यांच्याकडे सध्या  ७५ लाख लिटरच्या जवळपास दूध आहे. हे दूध पुढील दोन दिवस पुरणार असले तरी गुरुवारी मात्र मुंबईकरांची दुधासाठी दैना होणार आहे. दरम्यान, इग्लू डेअरी पॅकिंग सर्व्हिस यांच्याकडे दररोज गोकूळ, गोविंद, गोवर्धन, नंदिनी यांच्या १० लाख लिटर दुधाचे पॅकिंग केले जात असून त्यांच्याकडे  ३० लाख लिटरचा स्टॉक आहे.

मुंबईकडे येणाऱया दुधाच्या टँकरला पोलीस संरक्षण

मुंबईला दुधाचा सुरक्षित पुरवठा व्हावा म्हणून राज्य सरकारनेही कंबर कसली आहे. त्यानुसार मुंबईला दुधाचा टँकर घेऊन जाण्यासाठी दूध संघाने पोलीस संरक्षणाची मागणी केल्यास ते तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱयांना दिल्याची माहिती दुग्ध विकास आयुक्त आर. आर. जाधव यांनी दिली.

दुधावरील मलई कोण खातेय; चौकशी करण्याची जनता दलाची मागणी

राज्य सरकारने शेतकऱयांकडून खरेदी केल्या जाणाऱया दुधाचा दर २७ रुपये ठरवून दिलेला  असतानाही दूध संघ केवळ १७-१८ रुपये दराने दुधाची खरेदी करत आहेत. त्यामुळे प्रतिलिटरमागे १० रुपये शेतकऱयांचे नुकसान होते आहे. तर मुंबईतील दुधाचा विक्री दर पूर्वीएवढाच ४२-४५ रुपये लिटर आहे. खरेदीचा दर कमी होऊनही विक्री दर कायम आहे. त्यामुळे वाढलेले नफ्याचे मार्जीन कोणाच्या घशात जात आहे, कोण मलई खातंय, याची चौकशी करण्याची मागणी करत जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी शेतकऱयांच्या आंदोलनाला आज पाठिंबा जाहीर केला. दरम्यान, दूध उत्पादकांच्या तोटय़ाला मुंबईकर जबाबदार नसतानाही आंदोलक नेते त्यांचा दूध पुरवठा तोडून कोंडी का करत आहेत, असा सवालही त्यांनी केला. शहरी ग्राहक दुधाची योग्य किंमत देत असतानाही शेतकऱयांना योग्य मोबदला मिळत नसेल तर सरकार संबंधित दूध संघांवर कारवाई का करत नाही, आसा सवाल नारकर यांनी केला.

गुजरातमधून येणाऱया अमूलच्या दुधाला खीळ

अमूलकडून मुंबईत दररोज १५ लाख लिटर दुधाचे वितरण केले जाते. हे दूध पुणे आणि नाशिक परिसरातून संकलित केले जाते. येथून कमी दूध संकलित झाल्यास अमूल गुजरातमधून दूध आणते. मात्र पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल हे शेतकऱयांच्या बाजूने उभे राहिले असून अमूलने गुजरातमधून मुंबईला दूध नेल्यास ते रोखू, असा इशारा दिल्याची माहिती अमूलच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. त्यामुळे तेथून येणाऱया दुधाला खीळ बसणार आहे.