
एच 1 बी व्हिसा शुल्कात जबर वाढ करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे हिंदुस्थानातील आयटी तंत्रज्ञांसह लाखो प्रोफेशनल्स हादरून गेले आहेत. अमेरिकेत परतण्यासाठी विमानतळांवर झुंबड उडाली आहे. अनेकांनी दिवाळी सुट्टी आणि लग्नाचे बेत रद्द केलेत.
अमेरिकेतील तरुणांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून स्थलांतरितांवर नियंत्रण आणण्याचे धोरण ट्रम्प यांनी स्वीकारले आहे. त्याचाच भाग म्हणून अमेरिकेत प्रवेशासाठी लागणाऱया एच 1 बी व्हिसाचे (कर्मचारी व्हिसा) शुल्क 6 लाखांवरून थेट 88 लाख करण्यात आले आहे. शनिवारी ट्रम्प यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले.
ट्रम्प यांच्या घोषणेनंतर दिग्गज टेक कंपन्यांनी लगेचच कर्मचाऱ्यांना ई-मेल संदेश पाठवले. अमेरिकेबाहेर असलेल्या एच 1 बी धारकांनी तात्काळ परतावे आणि अमेरिकेत असलेल्यांनी पुढचे काही दिवस देश सोडू नये, असे कंपन्यांनी बजावले. त्यानंतर अमेरिकेबाहेर असलेले हजारो हिंदुस्थानी कोंडीत सापडले आहेत. हा निर्णय 21 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. त्यामुळे नोकरी जाण्याच्या भीतीने अनेकांनी परतीची तिकिटे बुक केली असून विमानतळावर झुंबड उडाली आहे. तिकीट मिळालेल्यांनी फ्लाइट पकडण्यासाठी रांगा लावल्या आहेत. त्यातील अनेक जण दसरा, दिवाळी व इयर एन्डच्या सुट्टीसाठी आले होते. तर, काही जण लग्न समारंभांसाठी आले होते. एकाने तर स्वतःचे लग्न रद्द करून परतीची वाट धरल्याचे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे.
ते आपल्या बुद्धिमत्तेला घाबरतात! – पीयूष गोयल
अमेरिकेच्या एच 1 बी व्हिसावरील शुल्कवाढीवर केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘जगातील अनेक देशांना हिंदुस्थानशी व्यापार वाढवायचा आहे. आपल्याशी संबंध वाढवायचे आहेत, मात्र ते आपल्या बुद्धिमत्तेला काहीसे वचकून आहेत, असे गोयल म्हणाले.
व्हाइट हाऊस म्हणतं…
- एच 1 बी व्हिसाची शुल्कवाढ ही वार्षिक नाही त्रैवार्षिक आहे.
- ज्यांच्याकडे आधीपासूनच व्हिसा असेल त्यांना अमेरिकेत परतण्यासाठी 1 लाख डॉलर भरावे लागणार नाहीत.
- आताची शुल्कवाढ ही केवळ नव्या अर्जांसाठी आहे. आधीचा व्हिसा नूतनीकरणासाठी नाही.