मिंधे गटाच्या लेडीज गँगचा शिवसेनेच्या प्रवक्त्यावर हल्ल्याचा प्रयत्न

वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सडेतोड मुद्दे मांडले म्हणून मिंधे गटाने महिलांना पुढे करून शिवसेनेचे ठाणे येथील प्रवत्ते अनिश गाढवे यांच्यावर आज हल्ल्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी दुपारी साकेत ग्राउंड येथे घडली.

‘आज तक’ आणि ‘मुंबई तक’ या वृत्तवाहिन्यांच्या वतीने साकेत ग्राऊंड येथील हेलिपॅडजवळ टॉक शोचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात शिवसेनेच्या वतीने उपनेते सुषमा अंधारे, मिंधे गटाच्या वतीने नरेश म्हस्के आणि काँग्रेसच्या वतीने चरणसिंग सप्रा सहभागी झाले होते. या टॉक शो मध्ये पब्लिक पोलसाठी शिवसेनेचे ठाण्यातील प्रवत्ते अनिश गाढवे हेही सहभागी झाले होते. सुषमा अंधारेंबरोबरच गाढवे यांनीही सडेतोड मुद्दे मांडले.

आठ दिवसांपूर्वी झालेल्या एका टॉक शोमध्ये गाढवे यांनी मिंधे गटाची बोलती बंद केली होती. त्यामुळे आजच्या टॉक शोमध्ये मिंधे गटाने आपल्या महिला कार्यकर्त्यांची ठरवून गर्दी जमवली. गाढवे यांनी त्यांचे मुद्दे आक्रमकपणे मांडताच ठरल्याप्रमाणे मिंधे गटाच्या महिला कार्यकर्त्या गाढवे यांच्या अंगावर धावून गेल्या. वेळीच तेथून निघाल्यामुळे माझ्यावरील मोठा हल्ला टळला, अशी माहिती गाढवे यांनी दिली.