वर्षपूर्तीच्या दिवशीच महायुतीला तडे, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर मिंध्यांचा बहिष्कार

वर्षपुर्तीच्या दिवशीच महायुतीला जबर तडे गेले. सौर कृषी पंप योजनेत जागतिक विश्वविक्रम केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमावर मिंधे गटाने बहिष्कार टाकला. मंत्री, आमदारच काय, शिंदे गटाचा साधा चिरकूट कार्यकर्ताही या कार्यक्रमाकडे फिरकलाही नाही.

भाजप आणि मिंधे गटात मागील काही दिवसांपासून कलह निर्माण झाला आहे. मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घालणाऱया मिंध्यांच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी झापून काढले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठली. पण तेथेही त्यांची डाळ शिजली नाही. फडणवीस आणि मिंध्यांमधील अबोला राज्यात चर्चेचा विषय ठरला. नगर पालिका निवडणुकीतही भाजपने मिंध्यांना वाळीतच टाकले. या धुसफुसीचे पडसाद आज सौर कृषी पंप कार्यक्रमातही उमटले.

छत्रपती संभाजीनगर जिल्हय़ात मिंधे गटाचा एक खासदार, पाच आमदार आहेत. खासदार संदिपान भुमरे हे संसदेच्या अधिवेशनामुळे दिल्लीत आहेत. पालकमंत्री संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार, रमेश बोरणारे, विलास भुमरे यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. विशेष म्हणजे, महावितरणच्या वतीने छापण्यात आलेल्या पत्रिकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वांची नावे छापण्यात आली होती.

साहेब, तीन दिवसांतच सोलार पडले!

सौर कृषी पंप योजना राबवण्यात विश्वविक्रम केल्याबद्दल काwतुकगान सुरू असतानाच एका महिला शेतकऱयाने या योजनेची पोलखोलच केली. सौर कृषी पंप बसवल्यानंतर तीनच दिवसात पडला. पंपनीकडे दाद मागूनही उपयोग झाला नाही. मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही तरी दखल घ्या अशी मागणी या महिलेने केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘ताई, आम्ही तुमच्या तक्रारीची दखल घेतली आहे’ असे सांगूनही तिने, गंगाधर तुळशीराम नाईक हे नाव लिहून घ्या’ असे म्हणतच तिचा व्हिडीओ कॉलच बंद केला.