
पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगदा विस्तारीकरणाच्या उत्खननासाठी गायत्री क्रसेंट प्रोजेक्ट या ठेकेदार कंपनीस 5 लाख 15 हजार 915 ब्रास गौण खनिज उत्खननापोटी स्वामित्व धन व दंडात्मक रक्कम मिळून एकूण 32 कोटी 89 लाख 88 हजार रुपये भरण्याचे आदेश वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी दिले आहेत.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत खंबाटकी घाटात बोगद्याचे काम सुरू आहे. यासाठी गायत्री क्रसेंट प्रोजेक्ट या कंपनीस ठेकेदार म्हणून नेमण्यात आले आहे. या कंपनीने आतापर्यंत या ठिकाणी केलेल्या गौण खनिजप्रकरणी स्वामित्वधन व दंडात्मक रक्कम भरण्याची नोटीस संबंधित ठेकेदारास तहसीलदार भोसले व सातारा जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी बजावली होती. या नोटिसीविरोधात संबंधित कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन नोटीस रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. हे सरकारी काम असून, ज्या गटातून हे उत्खनन केले जात आहे, त्याच गटात हे वापरले जाणार आहे. त्यामुळे गौण खनिज स्वामित्वधन व दंडाची रक्कम आम्हाला लागू होत नसल्याने न्यायालयाने या नोटिसा रद्द कराव्यात व स्वामित्वधन दंडाची रक्कम माफ करावी, अशी मागणी ठेकेदाराने न्यायालयाकडे केली होती.
































































