
>>शिरीष कणेकर
संपूर्ण नाव : शिरीष मधुकर कणेकर.
वय : 80. सहा जून 2023 रोजी सहस्रदर्शन.
पत्नी : आहे.
मुलं : दोन. एक मुलगा, एक मुलगी. दोघंही अमेरिकास्थित.
शिक्षण : कायद्याचा पदवीधर.
आजार : मधुमेह, रक्तदाब, पाठदुखी, कातडीचा आजार.
काय करता? : हयातभर इंग्रजी पत्रकारिता. आता लताची गाणी ऐकतो व वेडावतो.
जवळची माणसं : दोन. मिलिंद अधिकारी व उज्ज्वल वाडकर.
तिसरा शोधतोय. सापडत नाही.
अकारण दुरावलेली व जीवनातून गेलेली माणसं : मधुसुदन भागवत, प्रफुल्लकुमार शेणई, किशोर देवधर, अभय पटवर्धन, शशी कोटणीस, शरद काशीकर.
वितुष्ट आलेली माणसं : दोन जम बसलेले मुखपृष्ठकार. त्यांनी दोन पुस्तकांना चितारलेली मुखपृष्ठs मी नाकारली. त्यांना ते रुचलं नाही. माझ्या पुस्तकांची मुखपृष्ठs माझ्या मर्जीनुसार असावीत हा मूलभूत विचारच त्यांना मान्य नव्हता. त्यांनी मुखपृष्ठ करायचं व मी नंदीबैलासारखी मान हलवायची हा शिरस्ता ते पाडू पाहत होते. याआधी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठs मी त्यांच्याकडून करून घेतली होती व लगेच स्वीकारली होती. या इतिहासाला त्यांच्याकडे काडीचीही पिंमत नव्हती. माझा होकार ही गृहीत धरलेली गोष्ट होती. ज्या दिवशी माझा पहिला नकार आला, त्या दिवशी त्यांनी माझं खातं बंद करून टाकलं. स्वतःची अशी मतं असलेल्या या लेखकाच्या पुस्तकाची मुखपृष्ठs यापुढे आम्ही करणार नाही असा बंडाचा व असहकाराचा झेंडा त्यांनी फडकावला. समजा, मी काही करून त्यांच्याशी मांडवली केली असती तरी त्यांचं एखादं मुखपृष्ठ नाकारण्याची माझी शामत झाली असती? त्यांनी माझाच पृष्ठभाग रंगवला असता. माणूस स्वतःच्या कलेपेक्षा स्वतःला मोठं समजू लागला की, असं होतं.
पतनाचे क्षण : आलेच नाहीत. ते आले असते तर माझे पतन झाले असते की नाही हे माझं मलाच कळलं असतं. आता केवळ तर्क करणच माझ्या हातात आहे. इट इज नॉट द सेम.
अभिमानाचे क्षण : अनेक. प्रत्येक वेळेला ‘अण्णा असते तर त्यांना किती आनंद झाला असता’ या विचारानं मी सद्गदित झालो. त्यांच्या हयातीत मी त्यांना केवळ लाज आणली. एमबीबीएसला मुंबई विद्यापीठात दुसऱया आलेल्या माणसाच्या या नालायक मुलाला त्या काळच्या थ्री डिग्री सायन्स (आताचं एफ.वाय.) परीक्षेचा साधा फॉर्म मिळवता आला नव्हता. शत्रूदेखील इतका वाईट वागला नसता. आता जरा ओठांवर स्मित खेळण्याचे दिवस देवदयेने आले होते, तर तुम्हीच नव्हतात. परवा कोणीतरी घरी आलं आणि भिंतीवरील अण्णांचा पह्टो पाहून म्हणालं, ‘‘तुमचा तरुणपणीचा वाटतं?’’ मला भरून आलं आणि तरीही मी मनातल्या मनात म्हणालो, ‘नका त्यांचा बिचाऱयांचा अपमान करू. त्यांचा मुलगा म्हणून घ्यायची माझी लायकी नाही.’
बातमीवर प्रथम माझं नाव छापून आलं तो एक अभिमानाचा क्षण होता. मराठीतून छापून आलेला प्रत्येक लेख माझ्यासाठी अभिमानाचे रंगीबेरंगी क्षण घेऊन आला. त्यांची पन्नास पुस्तके झाली ती रंगांची उधळण करीत आली. अण्णांचा नातू डॉक्टर झाला तो माझ्या आयुष्यातील बहुधा सर्वात अभिमानाचा व आनंदाचा क्षण होता. जो हम न कर सके, हमारे बेटेने कर दिखाया. त्यावेळचा एक गमतीशीर किस्सा सांगावासा वाटतो.
मला नाना पाटेकरचा पह्न आला होता. नेहमीप्रमाणे त्यानं खर्जात विचारले, ‘‘पोरगा काय करतो?’’
‘‘अरे नाना, तो यंदा डॉक्टर झाला.’’ मी उत्साहानं रटरटत म्हणालो.
‘‘तुला हे वाटलं असेल ना?’’
‘‘आनंद ना?’’ माझा उत्साह कायम होता.
‘‘नाही, आश्चर्य!’’ नाना म्हणाला (व त्याच्या नाना शैलीत ‘ख्यॅ ख्यॅ ख्यॅ’ करीत हसला). आपला मुलगा इतका कसा शिकला बुवा!
याच टाइपचे माझ्यावरचे (झोंबणारे) विनोद ऐकल्यानंतर मलाच मी अडाणी व अक्षरशत्रू वाटायला लागलो. सनदशीर वकील असूनही कोर्टात मी जणू केवळ आरोपी म्हणूनच जाऊ शकत होतो.
माझ्या एका वर्गमित्राच्या लग्नात बायकोशी माझी ओळख करून देताना तो दात काढत म्हणाला होता, ‘‘यांचे वडील मुंबईचे पोलीस सर्जन आहेत. यांच्याविषयी सांगण्यासारखं काही नाही.’’ काही न कळता त्याची बायकोही फिदीफिदी हसली. माझं डोपं गेलं. सांगण्यासारखं काही नाही म्हणजे? मी ‘लॉ कॉलेजा’त होतो? मी काय करायला पाहिजे होतं. यांच्याप्रमाणे लग्न…?
वडिलांच्या नावानं ओळखलं जाणं फारसं भूषणावह समजलं जात नसेल, पण मुलांच्या नावानं ओळखलं जाणं खचितच अभिमानास्पद आहे. मागल्या पिढीचा वारसा पुढल्या पिढीकडे सुपूर्द करून अनंतात विलीन होणे हीच आयुष्याची कृतार्थता…
– [email protected]





























































