
सामना प्रतिनिधी । नगर
नगर दक्षिण जिल्ह्याला जलसंजीवनी देणाऱ्या व 26 हजार दश लक्ष घन फूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या 5 हजार 727 दश लक्ष घन फूट पाणी शिल्लक राहिले आहे. त्यातच मृतसाठा 4 हजार 500 दश लक्ष घन फूट असून अवघ्या 1 हजार 227 दश लक्ष घन फूट पाणीसाठ्यावर 15 जुलैपर्यंत लाभार्थी गावांची व पाणी योजनांची पाटबंधारे प्रशासनाला तहान भागवावी लागणार आहे.
सध्या पिण्याच्या पाण्यासाठी मुळा धरणाचा पाणीसाठा आरक्षित करण्यात आला असून शेतीसाठी धरणाच्या आवर्तनाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी धरणाचा ताबा घेतला असून 15 जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन पाटबंधारे खात्याकडून केले जाणार आहे.
राहुरी तालुक्यात आता हवामान खात्याचा अंदाज व व्हईकाच्या भरवशावरच शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे नियोजन आखले आहे. धरणातून होणारे शेतीसिंचनाचे आवर्तन मिळणार नसल्याने पावसावरच शेतीचे गणित राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मांडण्यास सुरुवात केली आहे. शेतातील गहू, कांदा आणि उसाचे रान मोकळे झाल्याने खरिपाच्या मशागतीला सुरूवात झाली आहे.
काही ठिकाणी अद्यापही गळितापासून वंचित राहिलेला ऊस उभा असून त्याचा चार्यासाठी वापर सुरू झाला आहे. तर काही ठिकाणी राखलेल्या खोडव्याला पाण्याची टंचाई भासू लागली आहे. मुळा धरणातून डाव्या कालव्याला मिळणार्या शेवटच्या आवर्तनात कपात करण्यात आल्याने त्याचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला. त्यामुळे राहुरी तालुक्यात गहू, हरभरा आणि कांद्याच्या उत्पादनात घट झाली आहे. तर उसालाही आवर्तन मिळाले नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस जळून गेला. त्यामुळे दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मागील वर्षी तालुक्यात निच्चांकी पाऊस झाला. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामाला त्याचा फटका बसला. कमी पावसामुळे पाणी पातळी खोलवर गेली आहे.
नदीकाठावरील गावांमध्येही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. सध्या राहुरी तालुक्यात पश्चिमेकडील एका गावात अवघा एकच टँकर सुरू आहे. तर अनेक गावातून आता टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. चारापिकेही जळून गेल्याने राहुरी तालुक्यात चारा छावणी व चारा डेपो सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, प्रशासकीय स्तरावर या मागणीला सपशेल केराची टोपली दाखविण्यात येत आहे. या बाबत लोकप्रतिनिधीही उदासीन आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
राहुरी तालुक्यात सरासरीच्या 93 टक्के पाऊस होऊन यंदा मुळा धरण 100 टक्के भरणार असल्याचे संकेत हवामान शास्त्रज्ञांनी दिले आहेत. दोन वर्षापूर्वी मुळा धरण ऑगस्ट महिन्यातच दोनवेळा पूर्ण क्षमतेने भरले होते. तर मागील वर्षी धरणाला टक्केवारीची सरासरी ओलांडता आली नाही. त्यातच जायकवाडीला मुळा धरणातून 1.9 टीएमसी पाणी सोडावे लागल्याने त्याचा फटका मुळा धरणाच्या राहुरी तालुक्यातील लाभक्षेत्राला बसला.





















































