मिठी नदी पुनरुज्जीवित करण्याच्या कामाला आता वेग द्या! पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला विकासकामांचा आढावा

मिठी नदीचे पुनुरुज्जीवित करण्याच्या कामाला गती देऊन नदी व नदीशेजारील भागाचे सुशोभीकरण करण्याला प्राधान्य द्या. त्याचप्रमाणे नदीशेजारी पदपथ तयार करता येईल का याचाही अभ्यास करा, अशा सूचना प्रशासनाला देतानाच पर्यावरणमंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी माहीम कॉजवे जोड रस्ता, सेनापती बापट रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्ग जोडरस्ता या विकासकामांचा आढावा घेतला.

आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीए, मुंबई महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्य़ांसमवेत चर्चा करून आढावा घेतला. मिठी नदीचे पुनरुज्जीवन करणे तसेच नदीचा शाश्वत विकास करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. याबरोबरच सेनापती बापट रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यानच्या लिंक रोडच्या कामासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. माहीम कॉजवे जोड रस्त्याच्या कामाचाही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. शहरातील कांदळवनांचे चांगल्या पद्धतीने जतन–संवर्धन व्हावे यासाठी त्यांचे वन विभागाला हस्तांतरण करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, संजीव जयस्वाल, मुंबई शहर जिह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या