मुख्यमंत्र्यांनी तपासले मंत्र्यांचे प्रगतिपुस्तक

32

सामना प्रतिनिधी । मुंबई

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विविध मंत्र्यांच्या मागील चार वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेतला. निवडणुकीच्या दृष्टीने अंग झटकून कामाला लागा. लोकांच्या फायद्याची कामे करा, धोरणात्मक योजना बाजूला ठेवून लोकांना थेट फायदे देणाऱया योजनांवर भर द्या, अशा सूचना मंत्र्यांना या वेळी मुख्यमंत्र्यांनी केल्याचे सांगण्यात येते.

पुढील महिन्यात 31 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळाला चार वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर विविध मंत्र्यांच्या खात्याच्या कामगिरीचा आढावा घेतला. मंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयांचे सादरीकरण व अहवाल या वेळी सादर करण्यात आले. तसेच लोकांना थेट फायदा झालेल्या पाच निर्णयांची माहिती या वेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, राज्य मंत्री रवींद्र वायकर यांनी या वेळी त्यांच्या खात्याने घेतलेल्या निर्णयांचे सादरीकरण केले.

काही मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक खात्यांची जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आखणीन वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी पुन्हा अशाच स्वरुपाची बैठक बोलावण्यात येणार आहे. त्यात इतर उर्वरित मंत्र्यांच्या खात्यांचा आढावा घेण्यात येईल. मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतानाच मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना आगामी निवडणुकांची जाणीवही करून दिल्याचे सांगण्यात येते.

मंत्रिमंडळात फेरबदल?
पुढील महिन्यात दसऱयाचे औचित्य साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार व फेरबदल करणार असल्याची मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चा आहे. भाजप मंत्र्यांच्या मागील चार वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री हे भाजपच्या मंत्र्यांबाबत पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येते.

आपली प्रतिक्रिया द्या