धक्कादायक! युट्यूबवर पाहून पालकांनी केली अल्पवयीन मुलीची प्रसुती, नवजात बालकाला पार्किंगमध्य़े सोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्पवयीन मुलीने युट्युबवर व्हिडिओ पाहून स्वत:च घरी प्रसुती केल्याची धक्कादायक घटना उत्तमनगर भागातील कोंढवे धावडे परिसरात घडला आहे. त्यानंतर तिने नवजात बालकास इमारतीच्या पार्किंगमध्ये झाडाजवळ बेवारस अवस्थेत सोडून दिले. याप्रकरणी राज्य महिला आयोगाने गांभीर्याने दखल घेतली असून संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

कोंढवे धावडे परिसरात उत्तमनगर पोलिसांना रविवारी रात्री नवजात अर्भक बेवारस स्थितीत सापडले. त्यानुसार तपास करण्यात येत होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी संबंधित अल्पवयीन मुलगी खासगी दवाखान्यात तपासणीसाठी गेली होती. त्यावेळी डॉक्टरांनी तिला गर्भवती असल्याची शक्यता लक्षात घेऊन सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मुलीसह पालकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करुन मुलीला घरी आणले. घराशेजारील लोकांपासून ही बाब त्यांनी लपवून ठेवले होते.

अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे कोणाला कळू नये यासाठी मुलीसह तिच्या पालकांनी युटयुबवर व्हिडिओ पाहून तिची प्रसुती केली. त्यानंतर मुलीच्या आईने नवजात बाळ सोसायटीच्या पार्किंगमध्ये झाडाजवळ सोडून दिले होते. सोसायटी परिसरात कुत्रे भुंकत असल्याने रहिवाशांनी पाहणी केल्यावर त्यांना नवजात बालकाला दिसून आले.

घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन नवजात बाळास ससून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर काही वेळातच मुलीची आई बेशुद्ध झाल्याने तिला रूग्णालयात दाखल करण्यासाठी सोसायटीत रुग्णवाहिका आली. त्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर तपास करत आहे.

राज्य महिला आयोगाकडून दखल

कोंढवे धावडे परिसरात अल्पवयीन मुलीने स्वत:ची प्रसुती युट्युबवर पाहून केल्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर तिने आणि कुटुंबीयाने नवजात बाळ बेवारस अवस्थेत सोडून दिल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलिसांना याप्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.