अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी दोघांना जन्मठेप, श्रीगोंदा सत्र न्यायालयाचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी भानुदास गंगाराम भिसे (रा. धारकरवाडी, चिंभळे, ता. श्रीगोंदा) व नामदेव अंबू अडागळे (रा. चिंभळे) यांना दोषी धरून श्रीगोंदा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम तीन व चार अन्वये 10 वर्षांची शिक्षा व प्रत्येकी चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपींना या दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.

सदर खटल्यातील आरोपी भानुदास भिसे व नामदेव अडागळे या दोघांनीही दोन शेतकऱ्यांची शेती वाटय़ाने घेतली होती. पीडिता एका गावामध्ये तिच्या कुटुंबासह राहत होती. फिर्याद देण्याच्या पाच महिनेअगोदर पीडिता घराच्या पाठीमागील शेतात प्रातःविधीसाठी गेली असताना आरोपी भानुदास भिसे याने तिच्यावर अत्याचार केला.

दरम्यानच्या काळात पीडिता घरी एकटीच असताना दुपारी आरोपी नामदेव अडागळे घरात आला व त्याने पीडितेवर बळजबरीने अत्याचार केला आणि ‘ही घटना कोणाला सांगितल्यास तुझ्या आईला मारून टाकीन’, अशी धमकी दिली. भीतीपोटी झाल्या प्रकाराबाबत पीडितेने आईला सांगितले नाही. त्यानंतर पीडिताच्या आईने मुलीच्या पोटात दुखत असल्याने तीची सोनोग्राफी केली. त्यावेळी मुलगी पाच महिन्यांची गरोदर असल्याचे समजले. मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता पीडितेने घडलेली घटना सांगितली. याबाबत आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात पीडितेने बाळाला जन्म दिला.

सदर खटल्याची सुनावणी श्रीगोंदा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांच्यासमोर झाली. सदर खटल्यामध्ये एकूण आठ साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी, पीडित मुलगी, डॉक्टर, ग्रामसेवक, तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे-गायके यांनी काम पाहिले.