
हिंदुस्थानात अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ, तुघलकाबादमध्ये गुरू रविदास मंदिर उद्ध्वस्त केल्याचे प्रकरण तसेच ईव्हीएमच्या मुद्दय़ावरून मोदी सरकारविरुद्ध लंडनमधील हिंदुस्थानी बहुजन समाज आज रस्त्यावर उतरला. मोदी सरकार तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध लोकांनी यावेळी निदर्शने केली.
लंडनच्या संसदेसमोर हे शेकडो निदर्शक जमले होते. त्यात दलित, वाल्मीकी, बौद्ध, शीख आणि रविदास समाजाशी संबंधित संघटनांच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. एससी, एसटी, ओबीसी आणि धार्मिक अल्पसंख्याकांना एकजूट व्हावे, तसेच परदेशातील बांधवांनी हिंदुस्थानातील बहुजन बांधवांना सुरक्षित करण्याचे काम करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर हेसुद्धा यावेळी उपस्थित होते. हिंदुस्थानात लोकशाही पूर्णपणे संपली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला. भीमा- कोरेगाव प्रकरणानंतर आम्ही महाराष्ट्र बंद केल्याने 35 हजार लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले आणि गुन्हा केला नसतानाही लोकांना तुरुंगात डांबले जात आहे असे ते म्हणाले. अशा अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी एखादा आंबेडकरवादी रस्त्यावर उतरला तर त्याला नक्षलवादी ठरवले जाते आणि तो मुस्लिम असेल तर त्याला दहशतवादी म्हटले जाते अशी टीकाही त्यांनी केली. 22 सप्टेंबरला हा मुद्दा आपण संयुक्त राष्ट्रासमोर ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. आंबेडकर मेमोरियल कमिटीचे खुशविंदर बिल्ला यांनी ही निदर्शने कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संबंधित मुद्दय़ांवर आहेत असे सांगितले. संविधान सुरक्षित राहिले तरच आपण आपल्या ऐतिहासिक वास्तू सुरक्षित ठेवू शकतो असे सांगतानाच बिल्ला यांनी दिल्लीतील रविदास मंदिर तोडल्याबद्दल निषेध नोंदवला.

























































