मीरा-भाईंदर पालिकेच्या तिजोरीत ‘खटाखट खटाखट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मीरा-भाईंदर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता करवसुलीत मीरा-भाईंदर पालि केने आघाडी घेतली आहे. ३१ मार्चअखेर आर्थिक वर्ष संपत असल्याने प्रशासन करवसुलीसाठी अलर्ट मोडवर असून पालिकेच्या तिजोरीत ‘खटाखट खटाखट’ कर रूपाने पैसे जमा होत आहेत. २३ मार्चअखेर २४३ कोटी ४० लाख ६८ हजार ४४८ इतका मालमत्ता कर वसूल झाला आहे. विशेष म्हणजे यंदा नागरिकांनी रांगांमध्ये उभे राहण्यापेक्षा डिजिटल पद्धतीला पसंती दिली असून ऑनलाइन माध्यमातून १२८ कोटी ९१ लाख रुपये जमा झाले आहेत.

मीरा-भाईंदर महापालिकेने कर भरण्याची प्रक्रिया सुलभ केल्यामुळे ऑनलाइन भरणा करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. १,५९,६४ माल मत्ताधारकांनी ऑनलाइन १२८ कोटी ९१ लाख ९७ हजार ४८७ कर भरला आहे, तर १,४४,७६८ मालमत्ताधारकांनी ऑफलाइन रोख व धनादेश याद्वारे ११४ कोटी ४८ लाख ७० हजार ९६१ कर भरला आहे. यावरून वेळेची बचत आणि पारदर्शकतेमुळे नागरिक ऑनलाइन सुविधेचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. महापालिकेच्या सहा प्रभाग समित्यांपैकी प्रभाग समिती क्रमांक ४ ने सर्वाधिक ८९.७२ कोटींची वसुली करत आघाडी घेतली आहे.

प्रभाग समिती क्रमांक १ मध्ये २७ कोटी २९ लाख ५९ हजार १४८ रुपये, प्रभाग समिती क्रमांक २ मध्ये ९ कोटी ३६ लाख ९६ हजार ९५४ रुपये, प्रभाग समिती क्रमांक ३ मध्ये २६ कोटी ४० लाख ९९ हजार १४२ रुपये, प्रभाग समिती क्रमांक ४ मध्ये ८९ कोटी ७२ लाख ९३ हजार ५२८ रुपये, प्रभाग समिती क्रमांक ५ मध्ये २० कोटी ३८ लाख तर प्रभाग समिती क्रमांक ६ मध्ये ६२ कोटी ९९ लाख ९२ हजार ४७४ रुपये इतकी वसुली करण्यात आली आहे.

जप्तीची कारवाई
थकबाकीदारांविरोधात प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. थकबाकी असलेल्या मालमत्तांना नोटिसा बजावणे, मालमत्ता जप्त करणे आणि नळजोडणी खंडित करण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी ३१ मार्चअखेर कर भरणा करावा असे प्रशासनाने आवाहन केले आहे.