Mira Road Morcha – मराठी मोर्चाला परवानगी नाकारली, पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली; निकेत कौशिक नवे आयुक्त

मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची आज तातडीने बदली करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि मराठी एकीकरण समितीच्या मराठी अस्मितेसाठी आयोजित मोर्चाला परवानगी नाकारणे आणि मराठी कार्यकर्त्यांच्या धरपकडीचे आदेश देण्याच्या प्रकरणानंतर त्यांच्या या कारवाईमुळे राजकीय वातावरण तापले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पांडेंची मीरा-भाईंदरमधून उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी आता निकेत कौशिक यांची नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, मराठी माणसाला डिवचण्यासाठी मीरा-भाईंदरमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला मराठी जनतेने मंगळवारी जोरदार उत्तर दिले. मराठी एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आज मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणसांचा प्रचंड मोर्चा निघाला होता. हा मोर्चा निघू नये यासाठी सरकारच्या दबावाखाली असलेल्या पोलिसांनी प्रचंड दडपशाही केली होती.

मध्यरात्रीच नोटिसा काढल्या, शिवसैनिक आणि मनसैनिकांची धरपकड केली, मोर्चाला परवानगी नाकारली. मात्र तरीही मराठी माणसांचे मोहोळ घोंगावले. पोलिसांनी रोखल्यानंतर या मोर्चाने अक्षरशः रुद्रावतार धारण केला. तब्बल पाच तास चाललेल्या या मोर्चात मराठीचा जबरदस्त एल्गार घुमला. या मोर्चाने महाराष्ट्रद्वेष्ट्या महायुती सरकारच्या मुजोरीला मराठी माणसांनी जबरदस्त हादरा दिला.