
ऍपेक्स केअर हॉस्पिटलचा संचालक डॉ. महेश जाधव याचा न्यायालयाने जामीन फेटाळताच पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या जाधव याला स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि कासेगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने पाठलाग करून पकडले. त्याला महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले असून, उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
डॉ. जाधवने मिरज-सांगली रस्त्यावर ऍपेक्स कोरोना हॉस्पिटल सुरू केले होते. पुरेशी यंत्रसामग्री नसतानाही एम.एस. शिक्षण झालेल्या डॉ. जाधव याने 205 रुग्णांना दाखल करून घेतले होते. यापैकी काहीजणांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर पथकाने हॉस्पिटलवर छापा टाकून रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर हॉस्पिटल बंद करण्याचा आदेश दिला होता. तसेच नवीन रुग्णांवर उपचार करण्यासदेखील बंदी घातली होती. तरीही डॉ. जाधवने हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल करून त्यांच्यावर होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यांकडून उपचार केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी त्याच्याविरोधात फिर्याद दिली होती. त्यामुळे डॉ. जाधव याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. तत्पूर्वी महात्मा गांधी चौक पोलिसांनी सखोल चौकशी करून डॉ. जाधव याच्यासह सातजणांवर गुन्हा दाखल केला होता. यापैकी पाचजण अटकेत असून, दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत.
डॉ. जाधव याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सांगली जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला. जामीन फेटाळल्याचे समजताच न्यायालयाच्या आवारातून डॉ. जाधव याने पलायन केले. हे समजताच स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने डॉ. जाधव याचा पाठलाग सुरू केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि कासेगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्याला कासेगाव येथे पकडले.




























































