
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील गाजलेल्या ‘मिर्झापूर’ सीरिजमध्ये काम केलेला अभिनेता ब्रह्मा मिश्रा याचे निधन झाले आहे. या मालिकेत मुन्ना त्रिपाठीची भूमिका साकारलेल्या दिव्येंद्र शर्मा याने इन्स्टाग्रामवर ब्रह्मासोबतचा फोटो शेअर करून ही दु:खद माहिती दिली आहे. मिर्झापूरमध्ये ब्रह्मा मिश्राने ललितची भूमिका केली होती. या भूमिकेतून सर्वांचे मन जिंकलेल्या ब्रह्मा मिश्रा याच्या अकाली निधनामुळे मिर्झापूरची टीम शोकसागरात बुडाली आहे.
गुरुवारी वर्सोव्यातील फ्लॅटमधून पोलिसांना ब्रह्मा मिश्रा याचा अर्धवट कुजलेला मृतदेह सापडला. मृतदेह शविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला असून शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
Actor Bramha Mishra, best known for portraying Lalit in the popular series ‘Mirzapur’ found dead at his residence in Mumbai, say police
— ANI (@ANI) December 2, 2021
ब्रह्मा मिश्रा याने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. परंतु त्याला खरी ओळख ‘मिर्झापूर-2’ मध्ये साकारलेल्या ललितच्या भूमिकेमुळे मिळाली. ललितच्या भूमिकेमुळे चाहत्यांच्या मनामध्ये घर केलेल्या ब्रह्मा मिश्रा यानेही आयुष्यातील ही सर्वात चांगली भूमिका होती, असे म्हटले होते. ललितच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या ब्रह्मा मिश्रावर अनेक मिम्स देखील बनले होते.
View this post on Instagram
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये राहणाऱ्या ब्रह्मा मिश्रा याचे लहानपणापासून अभिनेता बनण्याचे स्वप्न होते. 2013 मध्ये आलेल्या ‘चोर चोर सुपर चोर’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तसेच अक्षय कुमार याच्या ‘केसरी’ या चित्रपटातही ब्रह्मा मिश्रा याने खुदादद खानची भूमिका साकारली होती आणि ‘मांझी द माउंटेन मॅन’ या चित्रपटातही भूमिका केली होती.
ब्रह्मा मिश्रा दिग्गज अभिनेते मनोज वाजपेयी यांना आपला आदर्श मानत होता. त्याच्यासोबत फोटो काढण्याची एकही संधी ब्रह्मा मिश्रा सोडत नव्हता. सोशल मीडियावर मनोज वायपेयी यांच्यासोबत फोटो शेअर करून त्याने हे आपले आदर्श असल्याचेही सांगितले होते.




























































