
महानगरपालिकेच्या निक्रियतेचा व स्वच्छता विभागाच्या भोंगळ कारभाराचा त्रास आता नागरिकांना स्वतःच्या खिशातून सोसावा लागत आहे. सावेडी, पाइपलाइन रोड, हनुमाननगर येथील रहिवासी राजेश सुखदेव पवार यांनी वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेकडून कचरा उचलला गेला नाही म्हणून बारा लाख रुपये खर्च करून स्वतःचा ट्रक्टर घेऊन परिसरातील कचरा उचलण्याची जबाबदारी त्यांनी उचलली आहे.
राजेश पवार म्हणाले, आमच्या घराच्या आवारात मोठमोठी झाडं आहेत. दर दोन महिन्यांनी झाडांचा पालापाचोळा, फांद्या आणि नारळाच्या शेंडी कापावी लागते; पण दर चार दिवसांनी येणारी घंटागाडी हा कचरा घेऊन जात नाही. महानगरपालिकेकडे झाडांचा पालापाचोळा उचलण्यासाठी स्वतंत्र गाडय़ा आहेत; पण त्या इथे कधीच येत नाहीत. कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. पूर्वी आम्ही पैसे देऊन खासगी वाहनातून हा कचरा उचलून टाकत होतो; पण हे वारंवार घडू लागल्याने आता आम्हालाच नवीन ट्रक्टर ट्रॉली घ्यावी लागली. आम्ही कर वेळेवर भरतो, तरीही आम्हालाच हा खर्च करावा लागतो, हे प्रशासनाचे अपयश आहे, असे पवार यांनी सांगितले.
हनुमाननगर परिसरातील इतर नागरिकांनीही अशाच तक्रारी केल्या आहेत. झाडांच्या फांद्या, मोठा कचरा किंवा बांधकामातील अवशेष उचलण्यासाठी महानगरपालिकेच्या गाडय़ा कधीच दिसत नाहीत. परिसरातील कचरा वाढत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे, अशीही नाराजी व्यक्त करण्यात आली.
‘स्वच्छ शहर’चे फक्त दावे
महानगरपालिका ‘स्वच्छ शहर’चे दावे करत असली तरी प्रत्यक्षात नागरिकांना स्वतःच स्वच्छतेची जबाबदारी उचलावी लागत आहे. कर भरूनही सेवा न मिळणं ही नागरिकांची दुहेरी शिक्षा ठरत आहे. आम्ही ट्रक्टर घ्यायचा, कचरा उचलायचा आणि भरायचा… मग महानगरपालिकेचं काम नक्की काय? असा सवालही नागरिक करु लागले आहेत.a