
घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा अखेर तीन महिन्यांनी शोध लागला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांसह स्थानिक पोलिसांनी केलेल्या मदतीमुळे अल्पवयीन मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संबंधित मुलगी 22 एप्रिलला नांदेड फाटा परिसरातील घरातून निघून गेली होती. सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमुळे मुलीचा शोध लागल्यामुळे मुलीच्या नातलगांनी आनंद व्यक्त केला आहे.
संबंधित अल्पवयीन मुलगी 22 एप्रिलला घरातून निघून गेल्यानंतर कुटूंबियांनी सिंहगड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लाड मुलीचा शोध घेत होते. दरम्यान, कुटूंबियांनी समाजसेवक शिवा पासलकर यांची भेट घेत मुलगी हरविल्याची माहिती दिली. त्यानुसार पासलकर यांनी पोलिसांकडून माहिती घेत मुलीबाबत सोशल मीडियावर शोधण्याचे आवाहन केले होते. तिचा फोटो व्हायरल करून मुलगी हरवलेली आहे, कोणाला आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले.
तब्बल तीन महिने मुलीचे कुटूंबिय सिंहगड पोलिसांसह समाजसेवक शिवा पासलकर तिचा शोध घेत होते. मात्र, तिचा कोठेही ठावठिकाणा लागत नसल्यामुळे नातलगांमध्ये भीतीचे वातावरण होते. दरम्यान, 21 जुलैला अल्पवयीन मुलगी आळंदी देवाची परिसरातील घाटमाथ्यावर मिळाल्याचा फोन कुटूंबियांना आला. त्यानंतर तिला आळंदी महिला आश्रमात तिला ठेवण्यात आले होते. तिची माहिती मिळताच कुटूंबियांसह पासलकर यांनी आळंदीत धाव घेत कागदोपत्री प्रक्रिया पुर्ण करीत तिला ताब्यात घेतले. शोध मोहिमेत पत्रकार प्रकाश यादव यांनी मोलाची भूमिका निभावली.






















































