‘मिशन टेस्टिंग’चा निकाल; 40 हजार चाचण्या पाच हजार कोरोनाबाधित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेल्या महिनाभरापासून वाढणाऱया कोरोनाबाधितांमुळे पालिकेने ‘मिशन टेस्टिंग’ सुरू केले असून 40 हजार चाचण्यांमध्ये तब्बल पाच हजारांवर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. प्रयोगशाळांमधील ‘आरटी-पीसीआर’ चाचण्यांसह आता रेल्वे स्टेशन, बस स्थानके, बाजार, मॉलसह गर्दीच्या ठिकाणी अँटिजन चाचण्या करण्यात येत आहेत. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली. दरम्यान, रुग्णसंख्या वाढल्याने मुंबईची काळजी मात्र वाढली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी कोरोना खबरदारीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोरोना रोखण्यासाठी पालिकेने आक्रमकपणे उपायोजना करण्यास सुरुवात केली असून दररोजच्या चाचण्यांचे प्रमाण 25 हजारांवरून 50 हजारांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवून पालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांत दिवसाला सुमारे 40 हजार चाचण्या करण्यात येत असल्याचे काकाणी यांनी सांगितले. मात्र वाढती रुग्णसंख्या पाहता मुंबईकरांना सुरक्षित अंतर राखणे, वारंवार हात धुणे आणि मास्कचा वापर करणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात मुंबईत दिवसाला 50 हजारांपेक्षा जास्त चाचण्या आणि एक लाखांहून जास्त लसीकरण करण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती पालिकेने दिली.

चौपाटय़ांवर निर्बंध कडक

मुंबईत कोरोना वाढत असतानाही चौपाटय़ा आणि पर्यटन स्थळांवर वाढत असणारी गर्दी चिंताजनक असल्यामुळे पालिकेने या ठिकाणी निर्बंध कडक करण्याचे आदेश प्रत्येक वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. स्थानिक पातळीवर आवश्यकतेनुसार निर्णय घेण्याचे अधिकार सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत. जुहू चौपाटीसह सर्वच चौपाटय़ांवर गर्दीची मर्यादा कमी करणे, अँटिजन चाचण्या करणे आणि विनामास्क कारवाई तीव्र करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

75 हजार बेडपर्यंत संख्या वाढवणार

  • लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांसाठी पालिका क्षेत्रात सध्या 14 हजारांवर बेड असून आठवडाभरात ही संख्या 23 हजारांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
  • तर लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर सेंटर – 2 (सीसीटी-2) पूर्ण कार्यक्षमतेने सुरू करण्याचे नियोजन असून 50 हजार बेड उपलब्ध करण्यात येतील अशी व्यवस्था असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
  • शिवाय पालिकेकडे सध्या दीड हजार आयसीयू, 9 हजार ऑक्सिजन आणि एक हजार व्हेंटिलेटर बेड आहेत. यातील सुमारे 40 टक्के बेड रिक्त असून या बेडची संख्या आवश्यकतेनुसार वाढवण्यात येणार आहे.

आधी विनंती, नंतर कारवाई!

कोरोना वाढत असल्यामुळे होळी उत्सव आणि रंगपंचमी साजरी करण्यास पालिकेने मनाई केले आहे. असे असतानाही गर्दी करून होळी उत्सव, रंगपंचमी साजरी होत असल्यास पालिकेकडून कारवाई केली जाणार आहे. यासाठी प्रत्येक प्रभागात पालिकेची पाच भरारी पथके कार्यरत राहणार आहेत. आधी या पथकांकडून विनंती करण्यात येईल. यावेळी वादावादी केल्यास कारवाई केली जाणार आहे. केवळ होळीपूजन करता येईल. गर्दी करण्यास सक्त मनाई असेल.