शफालीच्या फलंदाजीवर मिताली फिदा

सलामीवीर शफाली वर्माने पदार्पणाच्या कसोटीत दोन्ही डावांत अर्धशतके ठोकल्याने हिंदुस्थानी महिला संघाची कर्णधार मिताली राज तिच्या कामगिरीवर चांगलीच फिदा झाली. या युवा क्रिकेटपटूमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली असून तिला क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात उज्ज्वल भविष्य आहे, असे मतही मिताली राजने व्यक्त केले.

17 वर्षीय शफाली वर्माने इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीत पहिल्या डावात 96, तर दुसऱया डावात 63 धावांची खेळी केली. पदार्पणाच्या कसोटीत दोन्ही डावांत अर्धशतके झळकावणारी सर्वात युवा, तर एकूण चौथी फलंदाज ठरली. या कामगिरीच्या जोरावर ती या कसोटीची मानकरीही ठरली. मिताली राज म्हणाली, शफाली वर्मा सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये हिंदुस्थानची आधारस्तंभ आहे. कसोटी क्रिकेटमध्येही तिने लवकरच जुळवून घेतले आहे. टी-20 क्रिकेटमध्येही ती पहिल्या चेंडूपासून आक्रमक होत नाही. आधी खेळपट्टीचा अंदाज घेऊन मग ती आपली नैसर्गिक आक्रमक फलंदाजी करते. शफाली वर्माने दुसऱया डावात केलेल्या धावा अधिक महत्त्वपूर्ण होत्या, असेही मिताली राजने सांगितले.

‘‘शफाली वर्माच्या फलंदाजी भात्यात विविध अस्त्रे आहेत. ती एकदा लयीत आली की, कसोटीतही प्रभावी फलंदाजी करू शकेल, असा विश्वास होता. शिवाय जेव्हा आम्हाला कळाले की ब्रिस्टलची खेळपट्टी वापरलेली आहे. त्यामुळे चेंडू फारसे स्विंग होणार नाहीत. त्यामुळे शफालीच्या पदार्पणाची आम्हाला ही योग्य वेळ वाटली.’’

मिताली राज, कर्णधार

आपली प्रतिक्रिया द्या