
हिंदुस्थानच्या महिला संघातील खेळाडू मिथाली राज (Mithali Raj) हिचा जगातील नामवंत महिला खेळाडूंमध्ये समावेश होतो. मिथाली हिने आपल्या कारकिर्दीदरम्यान अनेक मैलाचे दगड पार केले असून हिंदुस्थानच्या महिला संघाला टॉपला नेण्यामध्ये तिचा वाघिणीचा वाटा आहे. याच मिथालीने आज एक नवा माइलस्टोन गाठला असून टीम इंडियाचा माजी खेळाडू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलनंतर अशी कामगिरी करणारी ती जगातील दुसरीच खेळाडू ठरली आहे.
मिथाली राज हिने 26 जून, 1999 ला तिने आयर्लंडविरुद्ध आपला पहिला एक दिवसीय सामना खेळली होता. आज एक दिवसीय कारकिर्दीतील 22 वर्ष तिने पूर्ण केली आहेत. सचिन तेंडुलकरनंतर अशी कामगिरी करणारी ती दुसरीच खेळाडू आहे. सचिन तेंडुलकर याने 18 डिसेंबर, 1989 ला आपला पहिला सामना आणि 18 मार्च 2012 ला शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. सचिनने 22 वर्ष 91 दिवसांच्या कारकिर्दीमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे केले.
मिथालीचे विक्रम
– एक दिवसीय क्रिकेटमध्ये 6 हजार धावांचा टप्पा पार करणारी मिथाली जगातील पहिली महिला खेळाडू आहे. 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणारी इंग्लंडची खेळाडू चार्लोट एडवर्डस हिच्या नावावर 5 हजार 992 धावांची नोंद असून ती दुसऱ्या स्थानावर आहे.
– आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारी मिथाली हिंदुस्थानची पहिली आणि जगातील दुसरी खेळाडू आहे. याआधी इंग्लंडची खेळाडू चार्लोट एडवर्डस हिने हा टप्पा पार केला होता.
– हिंदुस्थानकडून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 2 हजारहून अधिक धावा करणारी ती पहिली महिला खेळाडू आहे.
– तसेच 200 एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळणारी देखील ती हिंदुस्थानची पहिला महिला खेळाडू आहे.
– आयसीसीच्या वन डे विश्वचषकाच्या अंतिम लढतीत दोनदा (2005 आणि 2017) हिंदुस्थानचे कर्णधारपद भूषवणारी मिथाली पहिली खेळाडू आहे.
– महिलांच्या आंतरराष्ट्रीय कसोटी लढतीत 200 धावा करणारी मिथाली पहिली खेळाडू आहे. 2002 ला इंग्लंडविरुद्ध तिने 214 धावांची खेळी केली होती.



























































