मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामाची आयुक्तांकडून पाहणी, पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केली. कामाच्या गतीबद्दल समाधान व्यक्त करतानाच पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे उद्दिष्ट साध्य करावे, त्यासाठी आवश्यकता भासल्यास अतिरिक्त संयंत्रे व मनुष्यबळ तैनात करुन दोन शिफ्ट काम करण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले.

आयुक्त चहल यांनी मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाची प्रारंभी माहिम कॉजवे येथील मिठी नदीचे पातमुख (outfall) येथे पाहणी केली. त्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुलात अमेरिकन स्कूल मागे आणि बीकेसी पूर्व- पश्चिम जोडणारा उड्डाणपूल येथेही त्यांनी भेट देऊन कामाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू, उपायुक्त संजय दराडे, प्रमुख अभियंता  संजय जाधव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त  वेलरासू म्हणाले की,  बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे अशा तिन्ही भागातून सुमारे 21 किलोमीटर लांबीचा मिठी नदीचा प्रवाह आहे. त्यातून गाळ काढून स्वच्छता करण्याचे काम वेगाने सुरू आहे. कंत्राट कालावधीदरम्यान मिठी नदीमधून सुमारे 1 लाख 38 हजार 830 मेट्रीक टन एवढा गाळ उपसण्याचे लक्ष्य असते. यापैकी 70 टक्के म्हणजे 98 हजार 500 मेट्रीक टन गाळ हा पावसाळापूर्व साफसफाई म्हणून काढला जाणार आहे. या 98 हजार 500 मेट्रीक टन पैकी आतापर्यंत 26 हजार 118 मेट्रीक टन गाळ काढण्यात आला आहे. पावसाळापूर्व उद्दिष्टाच्या 29 टक्के काम पूर्ण झाले असून पावसाळ्यापूर्वी संपूर्ण उद्दिष्ट गाठले जाईल, अशारितीने कामास गती देण्यात आली असल्याचेही  वेलरासू यांनी सांगितले.