
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी मूळ गाव सरकोली (ता. पंढरपूर) येथे हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थित जनसमुदायाला अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे.
जनसामान्यांचे ‘नाना’ अशी ओळख असलेला लोकनेता आमदार भारत भालके यांना 30 ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर वेळीच उपचार घेत त्यांनी कोरोनावर मातही केली होती. मात्र, काही दिवसांत त्यांची तब्येत पुन्हा खालावली. त्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल केले होते. तिथे चाचणीअंती त्यांना पोस्ट कोविड झाल्याचे निदान झाले होते. भालके यांना शुगर व रक्तदाबाचाही त्रास होता. कोरानातून बरे झाल्यानंतरही ते गोरगरीबांसाठी रस्त्यावर उतरून मदत करत राहिले. आमदार भालके यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि पंढरपूरकरांवर मोठा आघात झाला आहे.
‘जायंट किलर’ भारत भालके
जनसामान्यांचे ‘नाना’, आमदार भारत भालके हे थेट जनसामान्यांमध्ये रमणारे आणि बेधडक स्वभावाचे म्हणून ओळखले जायचे. लहानातील लहान कार्यकर्ता आणि मतदारही थेट त्यांना पह्नवर संपर्प साधू शकत होता. याच लोकप्रियतेच्या जोरावर ते सलग तिसऱयांदा विधानसभेत पोहचले होते. 2009 मध्ये ‘रिडालोस’कडून निवडणूक लढवत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव करत ‘जायंट किलर’ अशी आपली ओळख बनवली. यानंतर 2014 मध्ये पंढरपुरात प्रशांत परिचारक यांचा तिरंगी लढतीत त्यांनी पराभव केला. भालके यांनी ही निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढविली होती. 2019च्या निवडणुकीत काँग्रेसचा ‘हात’ सोडून आमदार भालके यांनी राष्ट्रवादीचे ‘घडय़ाळ’ हाती बांधले आणि ज्येष्ठ आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा पराभव करीत विजयाची हॅट्ट्रिक साधली. आपल्या रांगडय़ा आणि गावरान वक्तृत्व शैलीच्या जोरावर त्यांनी मोठा जनसंपर्प निर्माण करीत सलग तीन वेळा आमदारकी मिळविली.































































