
सामना प्रतिनिधी । पेण
मोदी सरकारने जम्मू काश्मीर मधील कलम 370 व 35 अ रद्द करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केल्यावर देशातील डाव्या विचार सरणीच्या पक्षांनी या विरोधात मुंबईतील आझाद मैदानावर बुधवारी निर्दशने केली. मात्र डाव्या विचार सरणीचे शेतकरी कामगार पक्षाचे पेण पाली विधानसभा मतदारसंघाचे आमदार धैर्यशील पाटील यांनी मात्र राज्यसभा व लोकसभेने बहुमताने घेतलेल्या 370 व 35 अ रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत शेकाप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन केले. त्यामुळे कलम 370 वरून डाव्यांमध्ये फुट फडल्याचे पहावयास मिळाले. ही भुमिका एकट्या आ. धैर्यशील पाटील यांची नसून ती पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला आमदार धैर्यशील पाटील, जिप सदस्य महादेव दिवेकर, डि. बि. पाटील, राजा पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या संदर्भात पुढे बोलताना आ. धैर्यशील पाटील म्हणाले की, देश हितासाठी घेतलेल्या या निर्णयाला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला पाहिजे, असेही ते म्हणाले. दरम्यान, पेण तालुक्यात झालेल्या अतीवृष्टी मुळे आलेल्या पुरामध्ये हजारो ग्रामस्थांचे कोट्य़वधींचे नुकसान झाले आहे. या मध्ये गणपती कारखानदार, मस्य पालन करणारे शेततळीधारक, पोल्ट्री उद्योग, शेतकरी, घराचे व मालमत्तेचे नुकसान झालेले ग्रामस्थ, व्यापारी वर्ग यांचा समावेश आहे तरी शासनाने पुरग्रतांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली.























































