
पक्षविरोधी कृत्य करून शिवसेना पक्ष सोडून गेलेल्यांवर कारवाई करणे आवश्यक होते आणि पक्षविरोधी कृत्य केल्यास हटवण्याचे अधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहेत, अशी ठाम भूमिका शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज घेतली.
आमदार अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू असलेल्या सुनावणीचा आजचा सहावा दिवस होता. शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांनी संपूर्ण दिवस सुनील प्रभू यांची उलटतपासणी केली. शुक्रवार आणि शनिवारीही सुनील प्रभू यांची उलटतपासणी सुरू राहणार आहे.
पक्षाची घटना, प्रतिनिधी सभा व नियुक्त्यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुनील प्रभू म्हणाले की, नेता कोण असावा ते पक्षाच्या प्रतिनिधी सभेत ठरते. त्यावर 2013 मध्ये तुम्ही प्रतिनिधी सभेचा भाग होतात का आणि तुम्ही महापौर असताना महापौरांना प्रतिनिधी सभेचा भाग होण्याची परवानगी नव्हती. हे खोटे आहे. मी महापौर होतो अथवा नव्हतो, पण मी प्रतिनिधी सभेचा सदस्य होतो. मी मतदानाचा हक्क बजावला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. 2018 ते 2013 या काळात पक्षांतर्गत निवडणुका घेतल्याच नव्हत्या. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवडणूक पक्षाच्या घटनात्मकदृष्टय़ा वैध नव्हती. कारण पक्षाच्या घटनेत तशी तरतूद नव्हती, असा प्रश्न महेश जेठमलानी यांनी केला. त्यावर हे खोटे आहे, असे उत्तर सुनील प्रभू यांनी दिले. शिवसेनेची घटना व विचारधारेच्या विरोधात असलेल्या पक्षाशी युती करण्याची परवानगी आहे का, या प्रश्नावर सुनील प्रभू यांनी हो, असे उत्तर दिले.
संपर्कप्रमुख म्हणून प्रभूंचे मतदान
सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेत संपर्कप्रमुख या नात्याने मतदान केले होते, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते-खासदार अनिल देसाई यांनी विधान भवनाच्या बाहेर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली. पक्षांतर्गत निवडणुकीच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, त्यांनी पक्ष नाही म्हटले म्हणून त्यांच्या दावा खरा ठरत नाही. प्रत्येक पक्षाची पक्षांतर्गत निवडणूक होते. 2018 साली निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणूक झाली. तिथे निवडणूक अधिकारी नेमका गेला होता, त्याची संपूर्ण नोंद करून घटना दुरुस्ती केली, त्याबाबतचे ठरावसुद्धा पत्राद्वारे आयोगाकडे पाठवतो. 23 जानेवारी 2018 चे चित्रणसुद्धा आम्ही निवडणूक आयोगाला पाठविले आहे. निवडणूक आयोगाला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याची पूर्तता आम्ही केली आहे, असे अनिल देसाई यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
शिंदेंचा तो ई-मेल विधिमंडळ पुस्तकात
एकनाथ शिंदे यांना 22 जून रोजी व्हीप बजावला पण तुम्ही पाठवलेल्या मेलवर 23 तारीख आहे, असा प्रश्न जेठमलानी यांनी केला. त्यावर 22 जूनला मेल पाठवायला सांगितला, पण ई-मेल 23 तारखेला गेला असेल, असे प्रभू यांनी स्पष्ट केले. ज्या ई-मेलवर व्हीप पाठवला तो ई-मेल शिंदे यांनी कधीही वापरला नाही, असे जेठमलानी यांनी सांगताच ते खोटे आहे, विधिमंडळाच्या पुस्तकात सर्वांचे ई-मेल आयडी आहेत. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे कार्यालय आहे. त्यात पक्षाचे सचिव ई-मेल आयडी देतात. त्यामुळे विधिमंडळाच्या पुस्तकातील ई-मेल आयडीच्या आधारावर मेल केला, असे प्रभू उत्तरले.

























































