भाजप नेत्यांच्या नावावर मते मागितली नाहीत! आमदार अपात्रतेच्या सुनावणीत सुनील प्रभू यांची स्पष्ट भूमिका

विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाने मला एबी फॉर्म दिला होता. शिवसेनेचा उमेदवार म्हणूनच मी 2019मध्ये लढलो आणि विकास कामाच्या मुद्दय़ावर मते मागून जिंकलो. भाजप नेत्यांच्या नावावर निवडणुकीत मते मागितली नाहीत, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे सुनावणी दरम्यान मांडली.

शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटात सहभागी झालेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी याचिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सुनील प्रभू यांनी दाखल केली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्षांपुढे सुनावणीच्या कार्यवाहीस सुरुवात झाली आहे. आमदार अपात्रतेच्या या प्रकरणात शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांनी याचिकादार आमदार सुनील प्रभू यांची सुमारे साडेचार तास उलटतपासणीत घेत साक्ष नोंदवली. जेठमलानी यांनी अडचणीत आणणारे प्रश्न विचारण्याचा या वेळी प्रयत्न केला. पण सुनील प्रभू यांनी अतिशय संयमी आणि सडेतोड उत्तरे देत शिंदे गटाच्या वकिलांचे आक्षेप फेटाळून लावले. शिवसेनेकडून अॅड. देवदत्त कामत, अॅड. असीम सरोदे सुनावणीच्या वेळी विधिमंडळात हजर होते.

सुनावणीत मराठी भाषेसाठी आग्रह

या सुनावणीत सुनील प्रभू मराठी भाषेसाठी आग्रही राहिले. त्यामुळे त्यांनी संपूर्ण उलटतपासणी मराठी भाषेत नोंदवली. अपात्रतेची याचिका व प्रतिज्ञापत्र इंग्रजी भाषेत आहे. तुम्ही शपथपत्र न वाचता सही केली का, असा सवाल महेश जेठमलानी यांनी केला. त्यावर मी अशिक्षित नाही. अडीच लाख मतदारांचे प्रतिनिधित्व करतो. मराठी भाषेत मी कॉन्फिडंट आहे. माझ्या मातृभाषेत मला चांगले समजते. त्यामुळे इंग्रजीतील प्रत्येक शब्द अॅड. असीम सरोदे यांच्याकडून मराठीत समजावून घेतला आणि मगच सही केली, असे सुनील प्रभू यांनी सांगितले.

साक्षीदाराच्या पिंजऱ्यात

उलटतपासणीच्या वेळेस सुनील प्रभू सुरुवातीला शिवसेनेच्या वकिलांच्या शेजारीच बसून होते. पण त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला तेव्हा लंच ब्रेकनंतर सुनील प्रभू यांच्यासाठी साक्षीदाराच्या पिंजऱ्याची व्यवस्था करण्यात आली. त्यात बसून सुनील प्रभू यांनी उत्तरे दिली.

नॉट मेमरी टेस्ट…

उलटतपासणी करताना अॅड. महेश जेठमलानी यांनी विचारलेल्या प्रश्नांवर शिवसेनेचे वकील अॅड. देवदत्त कामत यांनी आक्षेप घेतले. अॅड. जेठमलानी हे असंबंद्ध प्रश्न विचारून कामकाजाचा मौल्यवान वेळ वाया घालवत असल्याचे सांगितले. अॅड. जेठमलानी यांनी 2019च्या निवडणूक प्रचारातील माहिती सुनील प्रभू यांना  विचारली तेव्हा सुनील प्रभू यांनी आपल्याला आठवत नसल्याचे सांगितले. पण तरीही अॅड. जेठमलानी प्रश्न विचारत होते. तेव्हा अॅड. देवदत्त कामत संतप्त झाले आणि ‘क्रॉस एक्झामिनेशन इज नॉट अ मेमरी टेस्ट,’ अशा शब्दांत सुनावले. शिंदे गट व शिवसेनेच्या वकिलांमध्ये काही मुद्दय़ांवरून खडाजंगी झाली तेव्हा विधानसभा अध्यक्ष  राहुल नार्वेकर यांनी नाराजी दर्शवत वैयक्तिक टीकाटिप्पणी करू नका, अशी विनंती केली.

आजपासून सलग तीन दिवस सुनावणी

आमदार अपात्रता प्रकरणाच्या या याचिकेवर उद्या, बुधवारी सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. पुढील सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे.

विकासाच्या मुद्दय़ावर निवडून आलो

तुम्ही भाजपच्या युतीसोबत निवडून आलात का? निवडणूक प्रचारात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका-हल्ला केलात का? पोस्टर्सवर मोदी-शहा, देवेंद्र फडणवीस यांचे फोटो छापले होते का? असे प्रश्न महेश जेठमलानी यांनी विचारले. त्यावर सडेतोड शब्दांत उत्तर देताना सुनील प्रभू म्हणाले की, मी विकासकामांवर निवडून आलो आहे. मागील पाच वर्षांत केलेली कामे आणि पुढील पाच वर्षांतील कामे यावर मला मतदारांनी निवडून दिले.  2019च्या निवडणुकीत पोस्टर्सवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो छापले होते.

भाजपची कटप्रॅक्टीस

भाजपने चुकीच्या पद्धतीने, नियमबाह्य पद्धतीने व दबावतंत्राने आणि कटप्रॅक्टीसचा वापर करून आमदार पळवून नेल्याचे माध्यमातून वाचनात आले होते. मिलिंद नार्वेकर व रवींद्र फाटक यांनी सुरतमध्ये एकनाथ शिंदे यांची कशासाठी भेट घेतली याची मला कल्पना नाही, पण एकनाथ शिंदे संपका&च्या बाहेर असल्याने व्हीप बजावला, असे सुनील प्रभू यांनी एका प्रश्नावरील उत्तराते सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव टाळले,अध्यक्ष नार्वेकरांना देवदत्त कामतांनी रोखले

सुनावणी दरम्यान सुनील प्रभू यांनी माझा संविधानावर विश्वास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली आहे त्याचा आदर राखून मी हे सर्व बोलतोय असे स्पष्टपणे सांगितले. पण सुनील प्रभू यांची मराठीतील साक्ष इंग्रजीमध्ये भाषांतर करून नोंदवून घेताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळला. त्यावर शिवसेनेचे वकील अॅड. देवदत्त कामत यांनी तीव्र आक्षेप घेतला.

डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल तुम्हाला एवढा दुस्वास का? असा सवाल कामत यांनी अध्यक्ष नार्वेकर यांना केला. त्यानंतर नार्वेकर यांनी तशी नोंद केली. तुमचे भाषांतर ज्या पद्धतीने सुरू आहे त्यावर माझा विश्वास नाही, असे कामत म्हणाले. प्रभू उत्तर देताना कामत यांनी सुधारणा केली तेव्हा तुम्ही साक्षीदाराला भुलवत आहात असा आक्षेप नार्वेकर यांनी घेतला. त्यावर माझ्या पंचवीस वर्षांच्या कारकीर्दीत मी असे काम केले नाही, असे कामत यांनी सुनावले.

निवडणुकीच्या पोस्टवर शिवसेनाप्रमुखांचा फोटो

2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनाभाजपची युती होती. प्रचारासाठी लावलेल्या पोस्टरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पह्टो होते, असे सुनील प्रभू यांनी सांगितले.