
सामना प्रतिनिधी, येवला
वर्षानुवर्षे दुष्काळी असलेल्या भागाला मांजरपाडा प्रकल्पाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. मांजरपाडय़ासह इतर कामांना शासनाने निधीची तरतूद केली असल्याने ही कामे तत्काळ सुरू करावीत तसेच येवला व चांदवडमधील दुष्काळी गावांना जलसंजीवनी देण्यासाठी दरसवाडी ते डोंगरगाव या पोहोच कालव्याचे अस्तरीकरण करावे अशी मागणी आमदार नरेंद्र दराडे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली.
नरेंद्र दराडे यांच्या पुढाकारातून शनिवारी नाशिक येथील सिंचन भवनात मांजरपाडा प्रकल्प व पुणेगाव दरसवाडी पोहच कालव्याच्या कामासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्याकडे दराडे यांनी ही आग्रही मागणी केली. यावेळी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गिरीश संघानी, नांदूरमधमेश्वर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव जाधव, सहाय्यक अभियंता विश्वास दराडे, चेतन पवार तसेच शिवसेनेचे सर्जेराव सावंत, काँग्रेसचे अरुण आहेर, पंचायत समितीचे उपसभापती रूपचंद भागवत यावेळी उपस्थित होते.
मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्यासाठी शासनाने सुप्रमा मंजूर करून निधी दिला आहे. त्या कामाला तातडीने सुरुवात करावी अशी मागणी करत दुष्काळी भागाला पाण्याचा पुरेपूर लाभ द्यायचा असेल तर पूर्ण कालव्याचे अस्तरीकरण करा. यासाठी सुमारे 170 कोटींचा खर्च येणार आहे. पाण्याच्या योग्य वापर होण्यासाठी अस्तरीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा अशी सूचना दराडे यांनी केली. या कामाला चालना देण्यासाठी जिह्यातील सर्व आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांकडे बैठकीचा आग्रह धरू असे दराडे यांनी यावेळी सांगितले. मांजरपाडय़ाच्या प्रलंबित कामांनाही चालना देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
दरसवाडी डोंगरगावदरम्यान ठेकेदारांनी ठिकठिकाणी अर्धवट काम ठेवल्याने चाचणीदरम्यान पाणी अडले होते. हे दराडे यांनी निदर्शनास आणून दिल्यावर मधल्या भागातील सोडलेले काम पंधरा दिवसांत पूर्ण करू तसेच पावसाने धरण भरल्यास चाचणीसाठी पाणी सोडण्याचे आश्वासनही अहिरराव यांनी यावेळी दिले. नगरसूलजवळ कालव्याच्या रेल्वे क्रॉसिंगचे काम एका महिन्यात पूर्णत्वास जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी दराडे यांनी जिह्यातील प्रलंबित प्रकल्पांचीही माहिती घेत मुख्यमंत्र्यांसह जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
summary- mla narendra darade demands for manjarpada work resume

























































