
अवकाळी पावसामुळे आंबा-काजू बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले असून आमदार राजन साळवी यांनी मतदार संघातील आंबा बागांची पाहणी केली व आंबा बागायतदारांची तत्काळ बैठक घेतली. त्यानंतर राजन साळवी यांनी तत्काळ कृषी मंत्री दादा भुसे यांच्याशी दुरध्वनी द्वारे संपर्क साधून सदरची बाब निदर्शनास आणून दिली आहे .
अवकाळी पावसामुळे आलेला मोहोर गळून गेला आहे तर आलेल्या आंबा पिकावर काळे डाग पडण्याची शक्यता आहे. यामुळे यावर्षी तीन ते चार महिन्याचा आंबा हंगाम फक्त दोन महिन्यावर येणार असल्याने शेतकरी वर्गाचे कोट्यवधीचे नुकसान होणार आहे. तसेच अवकाळी पावसामुळे आता परत पालवी फुटणार असून त्यामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होणार आहे. आंबा फवारणीचे काम जोरात सुरू होते. मात्र पावसामुळे केलेली फवारणी फुकट गेली असून लाखो रुपयांची औषधे तसेच अंगमेहनत फुकट गेली आहे. आता परत फवारणीसाठी मोठा खर्च होणार आहे. तसेच सिझन उशिरा होणार आहे. म्हणजे परत पावसाची भीती राहणार आहे.
या सर्वाचा जबर फटका येथील आंबा काजू बागायतदार व व्यापारी यांना बसला आहे. सदरची बाब आमदार साळवी यांनी कृषी मंत्री भुसे यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी जिल्हा प्रशासनाला तात्काळ आंबा, काजू मोहोर नुकसान भरपाई बाबत सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले. व सदर नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळण्याचे आश्वासन दिले. बैठकी मध्ये आमदार राजन साळवी यांनी आंबा व काजू नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळणेबाबत येत्या अधिवेशनामध्ये विषय मांडणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आंबा व काजू बागायतदारानां दिलासा मिळाला आहे.
सदर आंबा बागायत दारांच्या बैठकीस शमूशिदिन मीर, रज्जाक यासीनखान गवाणकर, उमर हसन नाईक , संतोष वाघधरे, रमेश काजवे, नंदू मिरगुले आदी बागायतदारांचा समावेश होता असून आमदार राजन साळवी समवेत तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर, जिल्हा महिला बालकल्याण सभापती भारती सरवणकर,उपतालुका रामचंद्र उर्फ तात्या सरवणकर,विभाग प्रमुख कमलाकर कदम,उपविभाग प्रमुख राजन कोंडेकर,नंदू मिरगुले,अनिल नाणारकर,पंचायत समिती सदस्य प्रशांत गावकर,गिरीश करगुटकर उपस्थित होते.
























































