
नागपूर ते गोवा शक्तिपीठ मार्ग कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून आलेली नको ती कल्पना आहे. त्यामुळे या मार्गाला काँग्रेसचा विरोध असून शक्तिपीठ मार्ग रद्द होण्यासाठी सर्वांनी संघटित ताकद उभी करूया, असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी केले. कोल्हापुरातील अजिंक्यतारा कार्यालयात शेतकऱयांच्या बैठकीत ते बोलत होते.
नागपूर ते गोवा शक्तिपीठ मार्ग कोल्हापूर जिह्यातील अनेक गावांतून जाणार आहे. या मार्गासाठी हजारो शेतकऱयांच्या सुपीक जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. त्यामुळे या शक्तिपीठ मार्गाला विरोध दर्शवण्यासाठी विविध गावांतील शेतकऱयांच्या शिष्टमंडळाने आमदार सतेज पाटील यांची अजिंक्यतारा कार्यालय येथे भेट घेतली. यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, कोणत्याही कार्याची कोल्हापुरातून झालेली सुरुवात ही राज्यभर पोहचत असते. त्यामुळे नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधाची सुरुवात कोल्हापुरातून करूया, असे आवाहन त्यांनी केले. या महामार्गाची माहिती अजूनही लोकांना नाही. खरोखरच या महामार्गाची लोकांना गरज आहे काय? असा सवालही त्यांनी उपस्थित करत, जमिनी घेऊन रस्ता करणे हे संयुक्त ठरणार आहे काय? याचादेखील विचार करणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर जिह्यातील 90 ते 95 टक्के शेतकरी दोन एकराच्या आतील आहेत. या महामार्गाच्या विरोधासाठी येत्या 11 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय भव्य मोर्चा काढण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. शिवाय गरज नसलेला हा महामार्ग असून, कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून आलेली ही नको ती कल्पना आहे. त्यामुळे काँग्रेसचा याला जाहीर विरोध राहील, असेही त्यांनी जाहीर केले. शक्तिपीठ मार्ग रद्द झाला पाहिजे, यासाठी संघटित ताकद ठेवा, असे आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी केले. यावेळी सुधीर पाटोळे, मल्हारी पाटील, दादासा पाटील यांच्यासह तेरा गावांतील शेतकरी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

























































