सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
राज्यपालांच्या अभिभाषणाला विरोध करताना विरोधीपक्ष नेत्यांनी ‘3 इडीयट्स’, ‘शोले’, ‘रामगड के शोले’, ‘ऑल इज वेल’ या चित्रपटांचा उल्लेख केला. ‘शोले’ तर आमचा आहेच, परंतु विरोधी पक्षांचा ‘रामगड के शोले’ झाला आहे, असे सडेतोड उत्तर आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दिले.
धस पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीची अवस्था आता तर ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटासाखी झाली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया भादुरी, ऋतिक रोशन हे मल्टिस्टार होते, परंतु चित्रपट मात्र फ्लॉप झाला होता. राष्ट्रवादीची अवस्था अशीच झाली आहे. नावं खूप मोठी पण चित्रपट फ्लॉप आहे. ‘कभी खुशी कभी गम’मधील खुशी बाजूला गेली आहे. फक्त गम राहिला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच राज्यात सध्या बाहुबली चित्रपटाची चलती आहे. नरेंद्र बाहुबली, देवेंद्र बाहुबली या बाहुबलींचे सरकार व्यवस्थित काम करत आहेत. यात किती बल्लालदेव, कालकेय आले तरी बाहुबली हरणार नाही. पुढील अनेक वर्ष बाहुबलींचे आहेत, असेही आमदार सुरेश धस आपल्या भाषणादरम्यान म्हणाले.
यांच्या पक्षाला राष्ट्रवादी म्हणावे का?
विरोधी पक्ष सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचे राजकारण करत आहे. 1971 च्या युद्धानंतर इंदिरा गांधींना अटल बिहारी वाजपेयी यांनी ‘दुर्गा’ शब्द वापरला. परंतु नरेंद्र मोदींनी केलेल्या ‘एअर स्ट्राईक’ची स्तुती करण्यासाठीचे मोठे मन विरोधी पक्षाकडे नाही. मोदींना निच म्हणाले, चहाची टपरी टाकून देतो म्हणणारे आणि पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला ‘हुआ सो हुआ’ म्हणणारे याच्याच पक्षाचे आहेत. यांना आता राष्ट्रवादी पक्ष तरी म्हणावे का? असा सवालही धस यांनी उपस्थित केला.
26/11 हल्ला झाल्यानंतर त्याला ‘भगवा दहशतवाद’ म्हणणारे आणि हल्ला झाला त्या दिवशी तीन-तीन वेळा कपडे बदलणारे नेते यांच्याच सरकारमधील आहेत. त्यांना राष्ट्रवादी म्हणावे का? एअर स्ट्राईकमधील मेलेल्या दहशतवाद्यांचा आकडा मोजणारे नेतेही याच पक्षाचे आहेत, असा आरोपही धस यांनी केला. धस यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विधानपरिषदेत गोंधळ घातला.






























































