प्रत्येक आमदाराला 25 कोटींची ऑफर; पंजाबमध्ये ‘ऑपरेशन लोटस’, आपचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्षाने (AAP) भारतीय जनता पक्षावर (BJP) ‘ऑपरेशन लोटस’चा आरोप केला आहे. भाजप राज्यातील भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने मंगळवारी केला. एवढेच नाही तर भाजपने 10 आमदारांना 25 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप आपने केला आहे. पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना आरोप केला की, भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’चा भाग म्हणून राज्यातील काही आम आदमी पक्षाच्या आमदारांशी भाजपने संपर्क साधला होता. आपच्या दहा आमदारांशी संपर्क साधून त्यांना भाजपने पैसे आणि मंत्रीपदाची ऑफर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आपच्या या आरोपावर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. चीमा म्हणाले की, ‘पंजाबमधील आमच्या आमदारांशी संपर्क साधला जात आहे. आमच्या आमदारांना पक्षापासून वेगळे करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पाठवलेल्या काही लोकांकडून त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला जात आहे. दिल्लीतील बड्या नेत्यांच्या भेटीची त्यांच्यासाठी व्यवस्था केली जाईल, तसेच त्यांना 25 कोटी रुपयांची ऑफरही दिली आहे’.

जर आमदारांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांना सोबत आणले तर त्यांना जास्त पैसे दिले जातील, असा आरोप राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केला. पंजाबमधील आपच्या आमदारांना भाजप विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप चीमा यांनी केला. दिल्लीत असे प्रयत्न अयशस्वी झाल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या आठवडाभरापासून आमदारांना खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. चीमा यांनी यावेळी संपर्क साधलेल्या आमदारांची नावे सांगण्यास मात्र नकार दिला. ते म्हणाले की, ‘भाजपने 7 ते 10 आमदारांशी स्वतःच्या लोकांद्वारे संपर्क साधला. मी यासंदर्भात योग्यवेळी पुरावे सादर करेल’, असेही ते म्हणाले.