
मोनोरेलची सेवा सांभाळण्यात एमएमआरडीए सपशेल फेल ठरली आहे. चेंबूर ते जेकब सर्कल (महालक्ष्मी) यादरम्यान धावणाऱ्या मोनोरेलच्या मार्गावर गाड्यांमध्ये वारंवार बिघाड होत आहे. त्याचा प्रवासी सेवेवर विपरीत परिणाम झाल्याने आता मोनोरेलच्या देखभाल व ऑपरेशनची सर्व जबाबदारी एकाच कंत्राटदाराच्या हाती देण्याची नामुष्की एमएमआरडीएवर ओढवली आहे. यातून प्रवासी सेवेचा दर्जा सुधारेल की खासगी कंपनीची मनमानी वाढेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दिवसेंदिवस तोटा सोसत असलेल्या मोनोरेलची प्रवासी सेवा सुधारण्याकामी ठोस पावले उचलण्यात असमर्थ ठरलेल्या एमएमएमओसीएलने मोनोरेलची संपूर्ण सेवा थेट एकाच कंत्राटदाराच्या हाती सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंत्राटदार खासगी कंपनीशी पाच वर्षांचा करार करून त्या पंपनीची नेमणूक केली जाणार आहे. सद्यस्थितीत मोनोरेलची सेवा विविध खासगी कंपन्यांमार्फत सांभाळली जात आहे. त्यासाठी त्या त्या कंपन्यांशी अल्पकालीन वार्षिक करार केला जात आहे, मात्र संबंधित कंपन्यांमध्ये समन्वय नसल्याने गाडय़ांना विलंब व बिघाडावेळी जबाबदारीचा गोंधळ निर्माण होत असल्याने एकाच खासगी कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
सुविधा कमी, आव्हाने जास्त!
मोनोरेलची 19.54 किमी लांबीची मार्गिका आहे. पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबईच्या कनेक्टिव्हीटीसाठी ही मार्गिका अधिक उपयुक्त ठरेल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सेवा सुरू केली होती, परंतु या मार्गिकेवर सुविधा कमी आणि आव्हाने जास्त अशी परिस्थिती आहे. वारंवारच्या तांत्रिक बिघाडामुळे मोनोच्या फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे.
पुरेशा ट्रेन असूनही फेऱ्यांची बोंब
मोनोरेलच्या ताफ्यात नवीन ट्रेनची भर टाकण्यात आली आहे. असे असतानाही सध्या नियमित फेऱ्यांच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडत आहे. आठ जुन्या गाड्या आणि नवीन खरेदी केलेल्या सात गाड्या उपलब्ध असूनही 28 जुलै रोजी संपूर्ण मार्गावर फक्त एकच ट्रेन धावली.