
लॉकडाऊनमध्ये हजारो कामगार त्यांच्या मूळ गावी निघून गेले. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) प्रकल्पांची कामे ठप्प होती. आता त्या कामगारांना परत आणण्यासाठी कंत्राटदार कंपन्यांनी कंबर कसली आहे. रेल्वे बंद असल्याने रस्तामार्गाने या कामगारांना माघारी आणले जात आहे. आतापर्यंत 115 कामगार परतले असून येत्या जुलैमध्ये आणखी 755 कामगार कामावर येतील असे सांगण्यात येते. त्यानंतर एमएमआरडीएचे प्रकल्प पुन्हा गती घेणार आहेत.
एमएमआरडीएचे मेट्रो रेल्वे व अन्य अनेक प्रकल्प मुंबई महानगरात सुरू आहेत. कामगार नसल्याने त्या प्रकल्पांची कामे मंदावली आहेत. आता या प्रकल्पाचे कंत्राट घेतलेल्या जे. कुमार, लार्सन ऍण्ड टूब्रो, एनसीसीआय, आयटीडीसी या कंत्राटदार कंपन्यांनीच कामगारांना पुन्हा माघारी आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोना संकटामुळे हजारो कामगार उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील त्यांच्या मूळ गावी गेले आहेत.
विविध प्रकल्पांमध्ये 16 हजारांवर कामगारांची गरज
12 ऑगस्टपर्यंत लांब पल्ल्याच्या रेल्वे रद्द करण्यात आल्याने कामगारांना मिळेल त्या वाहनाने माघारी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती एमएमआरडीएचे सहआयुक्त बी. जी. पवार यांनी दिली. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार शेकडो भूमिपुत्रही काम करण्यास पुढे येत आहेत असे पवार यांनी सांगितले. एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पांमध्ये 16726 कामगारांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
175 भूमिपुत्र कामगारांची नियुक्ती
एमएमआरडीएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या जुलैमध्ये विविध राज्यांतून 755 कामगार पुन्हा मुंबईत परतणार आहेत. मेट्रो-7 प्रकल्पातील 115 कामगार पुन्हा कामावर दाखल झाले आहेत. राज्यातील 386 कामगार स्वतःहून कामावर परतले असून 175 स्थानिकांचीही लवकर नियुक्ती केली जाणार आहे. जे. कुमार कंपनीकडून 275, एनसीसीआयकडून 355 कामगारांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दोन लाखांपैकी फक्त एक लाख कामगार उरले
एमएमआरडीएच्या 950 प्रकल्पांमध्ये 2 लाखांपेक्षा जास्त कामगार काम करतात. कोरोना संकटामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊननंतर त्यातील फक्त 1 लाख 20 हजार कामगार उरले आहेत. होळीसाठी गावी गेलेले अनेक कामगार लॉकडाऊनमध्ये अडकल्याने अद्याप परतलेले नाहीत. भीतीपोटी त्यातील अनेक कामगार कामावर परतण्यासही तयार नाहीत. त्यांची समजूत काढून त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे लार्सन ऍण्ड टूब्रोचे वरिष्ठ अधिकारी सुब्रमण्यम यांनी सांगितले.





























































