
महामुंबई मेट्रोच्या 2 ए आणि 7 या मार्गिकांवर आता दररोज मेट्रोच्या 305 फेऱया धावणार आहेत. प्रवासी संख्येत वाढ झाल्याने गर्दीच्या वेळेत 21 अतिरिक्त फेऱया चालवण्यात येणार असून ‘पीक अवर्स’ला दर 5.50 मिनिटांनी मेट्रोची फेरी उपलब्ध होणार आहे. यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनने (एमएमएमओसीएल) तीन नव्याकोऱ्या ट्रेन आपल्या ताफ्यात दाखल केल्या आहेत. महामुंबई मेट्रोने नुकताच एका दिवसात तीन लाखांहून अधिक प्रवासी संख्येचा विक्रम नोंदवला आहे. याआधी मेट्रोच्या 2 ए आणि 7 या मार्गिकांवर 284 इतक्या दैनंदिन फेऱया चालवल्या जात होत्या. त्यात 21 अतिरिक्त फेऱयांची भर टाकून आता 305 फेया चालवल्या जाणार आहेत. वाढीव फेऱयांसाठी तीन नवीन ट्रेन तैनात केल्यामुळे दोन्ही मार्गिकांवरील ट्रेनची संख्या 21 वरून 24 इतकी झाली आहे. या माध्यमातून गर्दीच्या कालावधीत मेट्रो ट्रेन येण्याचा वेळ 6 मिनिटे 35 सेपंदांवरून 5 मिनिटे 50 सेकंदांवर आणण्यात आला आहे.



























































