मोनोचेकाम रखडवणाऱ्या एसटीएसई कंपनीला नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-monorail-001

सामना प्रतिनिधी । मुंबई

मोनोरेल सुरू करण्यास अक्षम्य विलंब करणाऱ्या लार्सन ऍण्ड टुब्रो स्कोमी इंजिनीयरिंग (एलटीएसई) कंपनीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या विलंबाबद्दल कंपनीचे 200 कोटी रुपयांचे डिपॉझिटही जप्त करण्याचा इशाराही दिला आहे.

मोनोरेल प्रकल्प कार्यरत करण्यासाठी एमएमआरडीएने एलटीएसईला सात वेळा मुदतवाढ दिली. मोनोरेलला अनेकदा अपघात झाले. मोनोच्या डब्यांना आग लागली. दुसरा टप्पा रखडल्याने कोट्यवधींचे नुकसान होत आहे. अखेर एमएमआरडीएने एलटीएसईला गेल्या 7 डिसेंबर रोजी नोटीस बजावली. मोनोकडे दुर्लक्ष केल्याबद्दल डिपॉझिट का जप्त केले जाऊ नये, अशी विचारणा एलटीएसईला करण्यात आली आहे. एलटीएसईने या नोटिसीला अद्याप उत्तर दिले नसल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रकल्पाच्या कामासाठी एमएमआरडीएकडून निधी मिळत नसल्याने कामात अडथळा येत असल्याचे एलटीएसईने म्हटले आहे. मात्र 2015 मध्ये 67 कोटी रुपये आणि फेब्रुवारी ते ऑक्टोबर 2017 दरम्यान 16.34 कोटी रुपये एलटीएसईला मोनो प्रकल्पासाठी देण्यात आल्याचा दावा एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

मोनोरेलचे दोन्ही टप्पे सुरू करण्याची मुदत 13 मे 2011 होती, परंतु त्यानंतर सात वेळा मुदतवाढ देऊनही अद्याप मोनो रेल पूर्णपणे सुरू झालेली नाही. असे करून एलटीएसईने कराराचे उल्लंघन केले आहे असे एमएमआरडीएने नोटिसीत म्हटले आहे. सध्या चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा सुरू असून वडाळा ते जेकब सर्कल हा दुसरा टप्पा डिसेंबर अखेरपर्यंत सुरू करण्याचा एमएमआरडीएचा विचार आहे.