नगर जिल्ह्यात ‘रोहयो’ मजुरांची संख्या घटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) सुरू असलेल्या कामांवरील मजुरांची संख्या कमी होऊ लागली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये रोहयो अंतर्गत 955 कामे सुरू असून त्यावर एकूण 3 हजार 980 मजूर काम करीत आहेत. मजुरांची संख्या ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यातील मजुरांच्या संख्येपेक्षा जवळपास अडीच हजारांनी कमी आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये बहुतांश गावांमध्ये परतीच्या पावसाने लावलेली हजेरी, यामुळे संख्या कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मागील वर्षीच्या अल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत गरज असेल, त्या प्रत्येकाला रोजगार पुरविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली होती. त्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत लोकांना रोजगार देण्यात आला. दुष्काळाची दाहकता तीव्र झाल्याने मार्च महिन्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांवरील मजुरांची संख्या 18 हजारांपर्यंत गेली होती. जून महिन्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर जिल्ह्यातील काही भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाला. तर, सप्टेंबरपासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. त्यामुळे रोहयोअंतर्गत सुरू असणार्‍या कामांवरील मजुरांची संख्या कमी होऊ लागली होती. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रोहयोवरील मजुरांची संख्या 6 हजार 708 पर्यंत आली होती. आता ही संख्या आणखी कमी झाली आहे.

मागील आठवड्यातील अहवालानुसार जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमध्ये मिळून ग्रामपंचायतीअंतर्गत 651 कामे सुरू असून या कामांवर 1 हजार 889 मजुरांची उपस्थिती आहे. तर, विविध यंत्रणांच्या अंतर्गत 304 कामे सुरू असून या कामांवरील मजुरांची संख्या 2 हजार 91 आहे. रोजगार हमी योजनेवर काम करणार्‍या मजुरांची संख्या पारनेर तालुक्यात सर्वांत जास्त आहे. या तालुक्यात सध्या 111 कामे सुरू असून तेथील मजुरांची संख्या 677 आहे. तर, सर्वांत कमी मजूर कोपरगाव तालुक्यात आहेत. या तालुक्यात 15 कामांवर मिळून 50 मजूर आहेत.